कोल्हापूर : नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरीकत्व सुधारणा विधेयक (सीएए) कायद्यांविरोधात बुधवारी सकाळी बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात विराट मोर्चा काढण्यात आला. डीएनए रिपोर्टच्या आधारे एनआरसी लागू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी ‘इन्कलाब जिंदाबाद, हमे चाहिए आझादी’ अशा घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोर्चाला सकाळी बिंदू चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चात प्रामुख्याने मोठ्या संख्येने मुस्लीमसह विवीध समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘डीएनए रिपोर्ट सच्चाई है, मुस्लीम-मराठा-शीख-ख्रिश्चन-लिंगायत हमारा भाई है’ ‘ईव्हीएम हटाव देश बचाव, संविधान बचाव’ असे फलक आंदोलकांच्या हाती झळकत होते. मोर्चामध्ये ब्राईट आर्मी संघटनेचे कार्यकर्ते आर्मी सारख्या गणवेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर तेथे मुख्य प्रवेशद्वारासमोर त्याचे सभेत रुपांतर झाले. प्रा. शाहिद शेख, जाफरबाबा सय्यद आदींनी भाषणातून ‘एनआरसी आणि सीएए’ ला प्रखर विरोध दर्शवला.शिष्ठमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. मोर्चात जाफरबाबा सय्यद, प्रा. शाहिद शेख, मौलाना बशीर, मौलाना फारुक, मौलाना मसूर, मुक्ती फारुक, महेश बावडेकर, अबू बखर मुल्ला, प्रमोद हर्षवर्धन, क्रांतीसेन कुमार, पल्लवी कांबळे, सारीका कांबळे आदी सहभागी झाले होते.