नृसिंहवाडी : घरच्या हलाखीच्या परिस्थितीत जन्मत: आलेल्या अपंगत्वावरही मात करून संसाराचा गाडा हाकताना नियतीने पुन्हा घात केला आणि पुन्हा त्याचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला़ नृसिंहवाडी येथील विनोद बंडू आगरे याची ही हृदय पिळवटून टाकणारी कहानी. जीवनाबरोबर संघर्ष करतानाच विनोदला हृदयविकाराचा त्रास होत आहे़ लवकरात लवकर आॅपरेशन करणे गरजेचे आहे़ मात्र, उपचारांसाठी तीन लाखांपर्यंत खर्च असल्यामुळे मदतीशिवाय पर्याय उरला नाही़ विनोदचे मूळ गाव औरवाड असून, सध्या तो नृसिंहवाडी येथे स्थायिक झाला आहे़ तो सध्या कष्ट करून आपले जीवन जगत आहे़ एका खेळण्याच्या दुकानात प्रति महिना पाच हजारांच्या मोबदल्यावर पत्नी अमृता, मुलगा आर्यन यांचे तो पालनपोषण करीत आहे़ जन्मत: आलेल्या अपंगत्वावर मात करून विनोदने संसाराचा गाडा सुरळीत सुरू ठेवला असताना त्याच्यावर नियतीने आणखी घात केला़ चक्कर का मारत आहे, याची तपासणी करण्यासाठी गेल्यावर डॉक्टरांनी हृदयविकार झाल्याचे सांगितले़ हृदयातील शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्यांमधील पडदा नसल्याने तत्काळ ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ हे ऐकून विनोदला मोठा धक्का बसला, तर त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या विनोदला तुमच्या, आमच्या मदतीची गरज आहे़ समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन मदतीचा एक हात पुढे केल्यास विनोदबरोबर त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल़ विनोदच्या भवितव्यासाठी सढळ हाताने मदतीची गरज आहे़ (वार्ताहर)
नृसिंहवाडीच्या विनोदला मदतीची गरज
By admin | Published: June 28, 2016 9:01 PM