नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुवारी दुपारी बारा वाजता ‘श्री नृसिंह सरस्वती स्वामी’ महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला. गेले सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
येथील दत्त मंदिरात गुरुवारी पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा झाल्यावर श्री चरणावर रुद्राभिषेक करण्यात आला. उत्सव काळात सुरु असलेल्या श्रीमद् गुरुचरित्र पारायणाची यावेळी सांगता झाली.
सकाळी वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण व दुपारी बारा वाजता ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविकांनी श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची उधळण केली. मानकरी ओंकार पुजारी यांनी श्रींची विधीवत पूजा केली. येथील ब्रम्हवृंदांनी पाळणा म्हटला आणि प्रार्थना केली. महिलांनी पाळणा जोजवला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडा वाटण्यात आला.
सायंकाळी तेरढोक (लातूर) येथील ह. भ. प. राघवेंद्रबुवा देशपांडे यांचे कीर्तन व संध्याकाळी साडेसात वाजता धूप, दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री शेजारती करण्यात आली.
फोटो - १४०१२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला. ०२) श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वती जन्मकाळ सोहळ्यानिमित्त केलेली सजावट. (छाया-प्रशांत कोंडणीकर नृसिंहवाडी)