प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी
: श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कोरोनाकाळात गावामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरावर पोहोचल्याने चिंता वाढली होती. मात्र, त्या संकटाशी सामना करत कोरोना समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.
कोरोना समिती व ग्रामस्थांनी गावात जनजागृतीबरोबर औषध फवारणी, तपासणी वाढविणे, रुग्णांबरोबर कुटुंबांना दिलासा देऊन योग्य मार्गदर्शन करणे, औषधोपचार व बेड मिळण्यासाठी सहकार्य करण्यासाठी सक्रिय राहिले. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली.
आतापर्यंत ३७१ तपासणी करण्यात आल्या असून त्यापैकी २५२ निगेटिव्ह आल्या. ११९ रुग्णांपैकी ९५ जण कोरोनामुक्त झाले असून १९ जण उपचार घेत आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणामध्ये गावाने आघाडी घेतली असून १६२२ जणांचा पहिला डोस तर ५७६ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत औरवाड, बुबनाळ, आलास, कवठेगुलंद, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी अशी गावे येत असून या गावांमध्ये १०६१ कोरोना तपासणी करण्यात आल्या. त्यापैकी ६४६ निगेटिव्ह तर ३०१ रुग्ण बरे झाले आहेत. ९७ जणांवर उपचार सुरु असून सतरा जणांचा मृत्यू झाला आहे.