प्रवीण देसाई-- कोल्हापूर --पावसाळ्यात विशेषत: पुरानंतर डेंग्यू, मलेरिया, डायरिया साथीचे आजार पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्याचा जागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांच्या मार्फत कोल्हापूर शहरात घराघरांत जाऊन प्रबोधन केले जाणार आहे. उद्या, बुधवार ते शुक्रवार या कालावधीत ही मोहीम सुरूराहणार आहे.यंदा झालेल्या पावसाने पुराचे संकट ओढवले होते. हे पुराचे पाणी ओसरत चालले आहे; परंतु हे पाणी ओसरत असतानाच त्या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन प्रसंगी साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिकांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांकडून हे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारपासून शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘कीटकजन्य व जलजन्य रोगनियंत्रण जनजागरण’ असे या मोहिमेचे नाव आहे.शहरातील सर्व महाविद्यालयांच्या ‘एनएसएस’चे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसोबत ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी, महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी, मुकादम असणार आहेत.सकाळी ९ ते ११ या वेळेत सुरू राहणाऱ्या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ५० घरांत जाऊन शहरवासीयांचे आरोग्यविषयक प्रबोधन करायचे आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डांत हे विद्यार्थी जाणार आहेत. प्रत्येक कॉलेजवर वॉर्डांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेकडून ही मोहीम कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेचे अधिकारी, सर्व महाविद्यालयांतील ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी ही मोहीम राबविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरनंतर ही मोहीम इचलकरंजी येथेही राबविण्यात येणार आहे. असा होणार जागरपावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, डायरिया असे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आजारांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत हे विद्यार्थी घराघरांत जाऊन प्रबोधनपर माहितीपत्रक वाटणार आहेत. त्याचबरोबर घरात कोणी आजारी आहे का, याची माहितीही ते घेणार आहेत. पावसाळ्यात उघड्यावरील भांड्यात तसेच टायरमध्ये पाणी साठले आहे का ? याची पाहणीही ते करतील. टायर किंवा अशा भांड्यांमध्येच साथीचे आजार पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होते. शहरवासीयांना हे विद्यार्थी पटवून देतील. दरम्यान, ठिकठिकाणी हे विद्यार्थी आरोग्य प्रबोधनपर पथनाट्यही सादर करणार आहेत.
‘एनएसएस’चा आरोग्याचा जागर
By admin | Published: July 19, 2016 12:40 AM