तिरुवनंतपुरम : अण्णा द्रमुक, द्रमुक, काँग्रेस, भाजपसह डझनभर पक्षांनी तामिळनाडू विधानसभेच्या आखाड्यात आपली शस्त्रास्त्रे पाजळली असतानाच आता तामिळनाडूची प्रादेशिक अस्मिता जपण्याचा दावा करणाऱ्या नाम तमिलर काची (एनटीके) या पक्षानेही सर्व २३४ जागांवर उमेदवार उभे करत तामिळनाडूच्या राजकारणात नवे रंग भरले आहेत. विशेष म्हणजे यातील निम्म्या जागांवर महिलांना संधी देत या पक्षाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्के मते मिळवणारा एनटीके द्रविडीयन आंदोलनाशीही नाते सांगत असल्याने हा पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तमिळ संस्कृती, तमिळ भाषा आणि त्यांची अस्मिता हा एकमेव अजेंडा घेऊन एनटीकेने तमिळ जनतेला साद घातली आहे. एकेकाळी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या सेंथामिझन सिमान यांनी २००९ मध्ये एनटीकेची स्थापना केली होती. सिमान हे तामिळनाडूच्या राजकारणात वारंवार प्रादेशिक हुंकार जोपासत असतात. त्यामुळे तामिळनाडूचे बाळ ठाकरे म्हणूनही त्यांना ओळखले जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनटीकेने कोणत्याच पक्षाशी युती न करता इतर घटक पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक मते घेतली हाेती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी अनेकांनी हात पुढे केले होते. मात्र, पेरियार विचारधारेशी निगडित असलेल्या एनटीकेने विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उडी घेतल्याने अनेक ठिकाणी हा पक्ष इतरांसाठी उपद्रव्यमूल्य ठरणार आहे.
जातीय समीकरणांची सांगड
एनटीकेने विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी निम्म्या जागांवर महिलांना संधी दिली आहे. यामध्ये एनटीकेने जातीय समीकरणाचीही सांगड घातली आहे. १३ ठिकाणी मुस्लिम तर ५५ जागांवर दलित उमेदवार उभे केले आहेत. एका जागेवर एनटीकेकडून ब्राह्मण उमेदवारही रिंगणात आहे.
...म्हणे तमिळ हिंदू नाहीत
तमिळ हे हिंदू नाहीत. तमिळींची एक वेगळची स्वतंत्र संस्कृती, समुदाय आहे. त्यांना ब्रिटिशांनीच हिंदूंशी जोडले असल्याचा दावा सिमान करत असतात, तर सिमान हे तमिळ लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप विराेधकांकडू केला जात आहे. विधानसभा निवडणुकीतही एनटीकेने पारंपरिक तमिळ संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केल्याने प्रमुख पक्षांची गोची झाली आहे.