संदीप आडनाईक कोल्हापूर : सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेली वैद्यकीय सेवेची परंपरा कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाने आजही कायम ठेवली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत पायाभरणी झालेल्या या रुग्णालयाने नव्या-जुन्या इमारतीचा बाज कायम ठेवत खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या तोडीस तोड सेवा देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. अद्ययावत उपकरणांच्या मदतीने गरीब रुग्णांना सेवा देण्याचा शाहूंच्या विचारांचा वारसा या सरकारी रुग्णालयाने जपलेला आहे.छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत १८९७ मध्ये या सेवा रुग्णालयाची पायाभरणी झाली. ‘द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल’ या नावाने सुरू झालेले हे रुग्णालय लष्करासाठी होते. तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल जे. डब्ल्यू रॅरी आणि छत्रपती शाहू महाराज यांचे नाव या रुग्णालयाच्या दर्शनी भागावरील कोनशिलेवर कोरलेले आजही पाहायला मिळते. या कोनशिलेवर रावबहादूर रघुनाथ व्यंकोजी सबनीस (दिवाण), दाजीराव अमृतराव विचारे (स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर), कृष्णाजी विष्णू पटवर्धन (ओव्हरसीअर), दत्तात्रय नीलकांत सबनीस (कॉँट्रॅक्टर) यांचीही नावे आहेत. ‘इन्फंट्री हॉस्पिटल’ या नावाने अजूनही त्याचे वीजबिल येते.कोल्हापूरच्या आसपासच्या बहुतांश ग्रामीण भागांतील रुग्णांना या रुग्णालयाचा उपयोग होतो. ११ एकरांत पसरलेल्या सेवा रुग्णालयाचा सहा एकरांचा परिसर सेवा रुग्णालयासाठी वापरण्यात येतो. रस्त्याच्या समोरच्या बाजूला असलेली पाच एकर जागाही याच रुग्णालयाच्या ताब्यात आहे. तेथे औषध भांडार, कर्मचारी निवास, लस साठवण केंद्राचा प्रस्ताव आहे.सेवा रुग्णालयाचे २००७ मध्ये श्रेणीवर्धन होऊन ३० खाटांचे रुग्णालय ५० खाटांचे झाले. पूर्वी तीन वैद्यकीय अधिकारी आणि एक वैद्यकीय अधीक्षक असा कर्मचारी वर्ग या रुग्णालयात सेवेत होता. सध्या ४६ कायमस्वरूपी नियमित कर्मचारीवर्ग असून २५ कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे आहेत. पूर्वीपासून प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयात सध्या २५० हून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागाचा लाभ घेतात. सेवा रुग्णालयात आदर्श टोकन पद्धत आहे. सेवा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे कामही सुरू आहे. तसेच स्वतंत्रपणे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग निर्मूलन केंद्र आहे.सेवा रुग्णालयाची वैशिष्ट्येकान, नाक, घसा, डोळे, मेंदू, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, लघवीची तपासणी, बालरोग चिकित्सा व उपचार, प्रसूतीदरम्यानच्या सेवा, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, अॅलोपॅथिक औषधोपचार, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, फिजिओथेरपी, एचआयव्ही उपचार केंद्र, समुपदेशन, हिरकणी कक्ष, अद्ययावत वातानुकूलित आॅपरेशन थिएटर, आयुष विभाग.विविध शस्त्रक्रियाराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामार्फत शाळा,अंगणवाड्यांना भेटी देऊन आजारी मुलांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात. ‘सीपीआर’चे बालशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद हिरूगडे यांनी ग्रामीण भागातील सात वर्षांखालील लहान २५ मुलांवर अंडकोष शस्त्रक्रिया केल्या.तंबाखू खाणाऱ्यास दंडसेवा रुग्णालय परिसरात स्वच्छता राखली जाते. या परिसरात तंबाखू खाऊन थुंकणाºयास २०० रुपयांचा दंड केला जातो. याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. दंडाची अधिकृत पावतीही केली जाते. याअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडे आतापर्यंत वीस हजारांहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. कॅन्सरपासून वाचविण्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी सेवा रुग्णालयाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.विविध आरोग्य शिबिरांचे आयोजनदरवर्षी १५ आॅगस्टला डायमंड स्पोर्टस आणि सेवा रुग्णालयामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येते. या वर्षी ३९ बाटल्या रक्त जमा झाले. याशिवाय जागतिक क्षयरोग सप्ताहातील जनजागृती मोहिमेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचा समावेश आहे. याशिवाय हृदयरोग आणि मौखिक कर्करोगासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये दंतशल्यचिकित्सक, सलाम मुंबई, कॅन्सर वॉरियर व स्थानिक स्वयंसेवी संस्था, शहरातील हृदयरोगतज्ज्ञ तसेच कान-नाक-घसा तज्ज्ञ यांची मदत घेण्यात आली. याशिवाय पोलीस, पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन सेवा रुग्णालयामार्फत केले गेले.देवस्थान समिती, ‘रोटरी’कडून मदतपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे सेवा रुग्णालयासाठी लागणाºया वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय रोटरी क्लबकडून अत्यावश्यक प्रसंगी वापरले जाणारे डी फिब्रिलेटर यंत्र भेट म्हणून देण्यात आले आहे.महापुरात विशेष सेवामहापुराच्या काळात सेवा रुग्णालयाने विशेष सेवा केली. या रुग्णालयातील डॉक्टरांनी कचरा उचलण्यापासून ते पूरबाधितांना लसीकरण व औषधे पुरविणारी यंत्रणा वेगाने राबविली.‘आयुष गार्डन’सेवा रुग्णालयातील ‘आयुष गार्डन’मध्ये वृक्षांची नावे लिहून त्या वृक्षाच्या औषधी महत्त्वाची माहिती लिहिली आहे. त्यामुळे या वनस्पतींचा नागरिकांत प्रचार व प्रसार होईल. आयुर्वेदामुळे रोग होण्यापूर्वीच प्राथमिक काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन मिळते.मिळालेले पुरस्कारस्वच्छता आणि जंतुसंसर्ग या विषयात चांगले काम केल्याबद्दल या रुग्णालयाला ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत २०१७, २०१८ आणि २०१९ या वर्षांत सलग तीन वेळा ‘कायाकल्प’ पुरस्कार मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत आयोजित रुग्णालयीन कामकाजामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभागामार्फत दोन वेळा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. याशिवाय प्रसूती आणि शस्त्रक्रिया यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील ‘लक्ष्य’ पुरस्कार यंदा २०१९ मध्ये मिळालेला आहे. राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन कार्यक्रमांतर्गत २०१९ मध्ये राज्य पातळीवर उपजिल्हा ५० या वर्गवारीत पात्र ठरलेले सेवा रुग्णालय हे एकमेवच आहे. त्यामुळेत्याची राष्ट्रीय निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रीय मूल्यांकन होणार आहे.वैद्यकीय अधीक्षकांची परंपरासन १९९० पासून येथे काम केलेल्या वैद्यकीय अधीक्षकांची नोंद एका फलकावर करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. व्ही. एन. मगदूम, डॉ. व्ही. बी. यादव, डॉ. ए. आर. रणदिवे, डॉ. सौ. पी. डी. पाटील, डॉ. व्ही. पी. देशमुख, डॉ. एस. डी. तेलवेकर, डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. पी. एस. भोई, डॉ. एस. बी. थोरात, डॉ. एल. एस. पाटील अशी परंपरा या रुग्णालयाला लाभलेली आहे.उमेश कदम वैद्यकीय अधीक्षकसेवा रुग्णालयाचे सध्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम आहेत. डॉ. कदम हे १ आॅगस्ट २०१३ पासून गांधीनगर येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून पन्हाळा, बांबवडे, परळी निनाई येथे काम केले आहे. सेवा रुग्णालयात अध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत लक्ष्य क्वालिटी टीम, संसर्ग व्यवस्थापन व पर्यावरण संरक्षण (आयएमईपी), कार्यकारी समितीत तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टरांसोबत वर्ग एकचे डॉक्टर्स, अधिकारी, वर्ग ४ आणि तीनचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पारिचरिका यांच्या सामूहिक प्रयत्नांतून या रुग्णालयाने मोठी भरारी घेतली आहे.