एकमेकांवर जिवापाड प्रेम असणाऱ्या बानगे (ता. कागल) येथील सख्ख्या भावांचे तासाच्या अंतराने निधन झाले. शंकर गणपती परीट (वय ८६) व शाहीर आण्णासो गणपती परीट (वय ७५) अशी त्यांची नावे आहेत. सकाळ आणि संध्याकाळचे जेवण घेण्यासाठी एकमेकांची वाट पाहत राहणाऱ्या भावांनी आपला देहही एकाचवेळी ठेवला. ही बाब ग्रामस्थांना चटका लावणारीच ठरली.
सोमवारी सकाळी साडेसहा वाजता थोरले बंधू शंकर यांचे निधन झाले. यामुळे आण्णासो हे अस्वस्थ झाले. शंकर यांच्या दहनासाठी सरणही रचण्यात आले. काही नातेवाईक यायचे होते म्हणून मृतदेह घरातून हलविला नव्हता. इतक्यात आठच्या सुमारास आण्णासो यांनी भावाच्या निधनाचा धसका घेतल्याने त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोघांचेही मृतदेह एकाचवेळी दहन करण्यासाठी घेऊन जाण्याची वेळ नातेवाईक व गावकऱ्यांवर आली.
यापैकी आण्णासो परीट यांची शाहिरी कला पंचक्रोशीत उल्लेखनीय होती. त्यांनी आकाशवाणी सांगली केंद्रावरूनही अनेकवेळा आपली कला सादर केली होती, तसेच विविध कार्यक्रम, निवडणूक प्रचारासाठी नेतेमंडळींकडून मागणी होत होती. दोघांच्याही मागे मोठा परिवार आहे.