किणी : येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ५० वर जाऊन पोहचली असून यापैकी ४५ पेशंट सक्रिय आहेत. दररोज ५ते ७ पाॅझिटिव्ह पेशंट आढळून येत असल्याने रुग्णवाढीवरून गावाची हाॅटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाल्याने २९ एप्रिल ते ३ मेपर्यंत दवाखाने, मेडिकल, दूध संस्था वगळता कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वेळी ७० पेशंट झाले होते. मात्र, एक दोन पेशंट आढळून येत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बघता बघता दरदिवशी ५ ते ७ पेशंट आढळून येत आहेत. यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांत निम्याहून अधिक पेशंटची संख्या वाढली आहे. एकाच घरातील सर्व कोरोनाबाधित पेशंट आढळून आले आहेत, तर काही घरांत एक दोन पेशंट आढळून आले आहेत. ५० कोरोना पेशंटपैकी ४५ पेशंट ॲक्टिव्ह असून यामध्ये १५ शासकीय व खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत, तर ३० पेशंटवर घरी अलगीकरणात उपचार सुरू असल्याचे माहिती आरोग्य सेवक सचिन मोरे यांनी दिली.
अलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या कोरोना पेशंटवर किणी आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. शर्मिला जंगम, आरोग्यसेविका योगिता तांबेकर, आरोग्यसेवक सचिन मोरे यांच्यासह आशा स्वयंसेविका उपचार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी दोन वेळा गावास भेट देऊन उपाययोजनांबाबतीत दक्षता समिती व ग्रामपंचायतीची आढावा बैठक घेतली. त्यांच्या सूचनांनुसार २९ एप्रिल ते ३ मेपर्यंत दवाखाना व मेडिकल, दूध संस्था वगळता कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.