करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात एप्रिलमध्ये झाली. मात्र कोरोनाबाधित व यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. करवीरमधील अनेक गावे हॉटस्पॉट होऊ लागली; पण कडक लॉकडाऊनला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या समूह संसर्गाचा मोठा फैलाव झाला आहे.
पहिल्या टप्प्यात शहरालगतची गावे हॉटस्पॉट झाली; पण मेच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे. तालुक्यात प्रथम दिवसाला १०० ते १५० कोरोनाबाधितांचा येणारा आकडा आता ३०० ते ३५० वर पोहोचला आहे. दररोजचा बाधितांची व मृतांची आकडेवारी पाहता कडक लॉकडाऊननंतरही करवीरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तर लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढणार आहे. आज, बुधवारी करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेत १० हजार ५७६ लोकांना कोरोनाची बाधा झाली; तर ३०३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.