अंजर अथणीकर -सांगली --एका व्यक्तीपासून अगदी हजार लोकांना रोजगार देणाऱ्या छोट्या-मोठ्या उद्योगांची सर्वंकष गणना करण्याचे काम सांगली जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणानुसार सांगली जिल्ह्यात २0१५ मध्ये सुमारे २ लाख ७0 हजार उद्योगांची नोंद झाली आहे. हा अहवाल नुकताच सादर झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील उद्योगांची गणना करण्याचे काम सांख्यिकी विभागाला देण्यात आले होते. पापड उद्योगापासून ते मोठ्या साखर कारखान्यापर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या उद्योगांची आर्थिक स्थिती, त्यांना लागणाऱ्या सुविधा, किती रोजगार यावर अवलंबून आहेत, याचा अहवाल नुकताच या विभागाने केंद्र शासनाकडे सादर केला आहे. या सर्व्हेचा अहवाल गोपनीय असल्यामुळे तो उघड करण्याचा अधिकार सांख्यिकी विभागाला नाही. यावर आता केंद्र शासनच निर्णय घेणार आहे. या अहवालावरच आता जिल्ह्यातील उद्योगांचे आगामी धोरण ठरणार आहे. जनतेच्या विकासासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते; मात्र याचा मूळ पाया असलेला सांख्यिकी विभाग दुर्लक्षित राहत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, साक्षरता, कामगार, मजुरी, रोजगार आदी सर्व प्रकारचे सर्व्हे तर या विभागाकडे नेहमीचेच असतात. आता नव्याने यामध्ये काही सर्वेक्षणांची भर पडत चालली आहे. यामुळे हा विभाग आता संपूर्ण वर्षभर कामाच्या ओझ्याखाली राहत आहे. त्याचबरोबर या विभागाने नुकतेच जिल्ह्यातील शेततळ्यांचे मूल्यमापन केले आहे. या शेततळ्यांमुळे होत असलेला विकास, त्यांची गरज आदींची माहिती यामध्ये आहे. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. या अहवालावरच आता आगामी अनुदान व नियोजनाची दिशा ठरणार आहे. आता नुकताच शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्याचा आदेश या विभागाला प्राप्त झाला आहे. या सर्व्हेमध्ये कर्मचाऱ्यांची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती, निवासस्थाने, मुलांची शैक्षणिक परिस्थिती याचा सर्वंकष विचार यामध्ये केला जाणार आहे. हा अहवाल सादर करण्यास सहा महिन्यांचा अवधी सांख्यिकी विभागाला देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या वेतन आयोगाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबरोबरच कामगार, मजूर, शेतकरी, उद्योग, साक्षरता, शिक्षण आदीचा सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे काम या विभागाला कायमस्वरुपी देण्यात आले आहे. सांख्यिकी दिनानिमित्त सोमवारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाकडून उद्योगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता शासकीय कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. विविध शासकीय कार्यालयांच्या मदतीनेच आम्ही आमचा सर्व्हे पूर्ण करून ज्या-त्या शासनाला आमचा अहवाल सादर करतो. या अहवालावरच शासन निर्णय घेत असते.- ग. स. धनवडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी विभाग दुर्लक्षितचकेंद्र व राज्य शासनाला महत्त्वपूर्ण माहिती पुरवणारा व ज्याच्या अहवालावर भविष्यातील शासनाचे नियोजन ठरत असते, तो विभाग मात्र दुर्लक्षित राहत आहे. सांगली जिल्हा सांख्यिकी कार्यालयाला बारा कर्मचारी मंजूर असताना, आठच कर्मचारी काम करीत आहेत. चार जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्तच आहेत. या विभागाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतानाही, अनेक सुविधा या कार्यालयाला नाहीत.
जिल्ह्यात उद्योगांची संख्या पावणे तीन लाख
By admin | Published: June 28, 2015 11:13 PM