कोल्हापूर : म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात रुग्ण वाढत असून सध्या ८० जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ६१ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून नजिकच्या काळात आणखी रूग्ण वाढले तर सीपीआरवर देखील मर्यादा येणार आहेत. त्यामुळे म्युकरवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १०१ जणांना म्युकरची लागण झाली होती. त्यातील १६ जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात नवे सहा रुग्ण दाखल झाले आहेत.
सर्वसाधारण परिस्थिती असणारे सर्वच जण म्युकरचा उपचाराचा खर्च जास्त असल्याने सीपीआरमध्येच उपचार व्हावेत यासाठी आग्रही आहेत. सीपीआरवगळता डी. वाय. पाटील रुग्णालय, डायमंड, अपल, सिद्धगिरी रुग्णालय याही ठिकाणी महात्मा फुले योजनेतून उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या सीपीआरमध्येच सर्वाधिक ६१ रुग्ण असून केवळ औषधोपचाराने रुग्ण बरा होताेच असे नाहीत तर शस्त्रक्रियाही करावी लागते.
चौकट
सीपीआरच्या डॉक्टरांवर मर्यादा
म्युकरच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. सीपीआरमध्ये अशा शस्त्रक्रिया करणारे तीन डॉक्टर आहेत. त्यांनी २३ शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांनाही या शस्त्रक्रिया वेळेत करण्यावर मर्यादा आहेत. परंतु या आजारावरील उपचारासाठी खर्च जास्त असल्याने, त्याच्यासाठीच्या इंजेक्शन्सची किंमत प्रतिडोस ४ ते ६ हजारपर्यंत असल्यामुळे अनेकजण उपचारासाठी सीपीआरला प्राधान्य देत आहेत.
चौकट
रुग्णालये वाढवण्याची गरज
म्युकरवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार करणारी रुग्णालये वाढवण्याची गरज असून ज्यांना परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांनी किती रुग्णांवर उपचार केले याचीही खातरजमा करण्याची गरज आहे.