कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमी होत असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. सध्या शहरात २९१२ सक्रिय रुग्ण उपचार घेत असून, त्यातील ४२४ रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील व राज्यातील आहेत.
कोल्हापूर शहरात दि. २५ ते दि. २८ एप्रिल या चार दिवसांत कोरोनाचे संक्रमण वाढले; परंतु त्यानंतर मात्र शनिवारपर्यंत रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोल्हापूरमध्ये बाहेरच्या राज्यातील, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे संख्या वाढल्यासारखे दिसते.
शहरातील चारही विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या २१ एप्रिलपासून ते दि. १ मे पर्यंत किती कोरोना रुग्ण सापडले याची माहिती महापालिकेने दिली. त्यामध्ये चारही विभागीय कार्यालयांनी पाचशेचा आकडा पार केला आहे. गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तर ८१० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
शहरातील कोरोना हॉटस्पॉट -
कोल्हापूर शहरातील २० हून अधिक ठिकाणे ही कोरोनाची हॉटस्पॉट ठरलेली आहेत. तेथे ५० पेक्षा जास्त आणि ९९ च्या आत कोरोना रुग्ण आढळले आहेत. ताराबाई पार्क, नागाळा पार्क, राजारामपुरी, पद्माराजे उद्यान, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, मंगळवारपेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसर, फुलेवाडी रिंगरोड, राजेंद्रनगर, सम्राटनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, संभाजीनगर, बाजारगेट यांचा कोरोना हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे.
कोविड केअर सेंटरमधील २५ कोरोनामुक्त -
महानगरपालिकेने स्थापन केलेल्या शिवाजी विद्यापीठ वसतिगृह क्रमांक ३ च्या कोविड केअर सेंटरमधील २५ रुग्णांवर उपचार करून रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले.
- महापालिकेची विभागीय कार्यालय/ त्याअंतर्गत रुग्णसंख्या -
(दि. २१ एप्रिल ते दि.१ मे पर्यंत)
१. गांधी मैदान विभागीय कार्यालय - ८१०
२. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय - ६३२
३. राजारामपुरी विभागीय कार्यालय - ५०५
४. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय - ५७१
- एकूण रुग्ण - २५१८
- इतर जिल्ह्यातील रुग्ण - २८१
- इतर राज्यांतील रुग्ण - १४३