कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात चोवीस तासांत १८२४ जणांना कोरोनाची बाधा झाली. ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण १४ हजार ६ जण बाधित आहेत. सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरात झाले आहेत. १७१६ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, गुरुवारच्या तुलनेत बाधित रुग्णांत ३०२ रुग्णांची वाढ झाली आहे. गावनिहाय तपासणीची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाचा आहे.
कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी आणि संशयित रुग्णांची शोध मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे. एका दिवसात १४ हजार ९२७ जणांची चाचणी करण्यात आली, त्यात १८२४ जण पॉझिटिव्ह तर उर्वरित सर्व निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. शहर, जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने कमी येत नसल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक बाधित आणि मृत्यू शहरात झाले आहेत. त्यानंतर हातकणंगले तालुक्याचा नंबर आहे. मृत्यूचा आकडा दोन अंकी असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३१ आहे. एकूण बाधित मृत ३३ पैकी २३ जण ६० वर्षांवरील आहेत. दहा जण दीर्घकालीन आजाराने बाधित होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत चौघांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या गावांची नावे अशी : प्रिन्स शिवाजीनगर, ताराबाई पार्क, मुक्त वसाहत, शाहूनगर राजारामपुरी, लक्षतीर्थ वसाहत, शाहुपुरी, फुलेवाडी, कसबा बावडा, कोल्हापूर शहर, नवे पारगाव, आळते, चावरे, माळवाडी, इचलकरंजी दोन, टोप (ता. हातकणंगले), भुयेवाडी, पिरवाडी, (ता. करवीर), हत्तीवडे (ता. आजरा), आवळी, केखले, कोडोली, वाघवे, जाखले (ता. पन्हाळा), खामकरवाडी (ता. राधानगरी), गारगोटी (ता. भुदरगड), सावरेवाडी (ता. चंदगड), शिरोळ व जयसिंगपूर (ता. शिरोळ).