कोल्हापूर: कोरोना संसर्गाचा जिल्ह्याला पडलेला विळखा काही केल्या सैल होताना दिसत नाही. निर्बंध कडक केले, चाचण्या वाढवल्या, उपचार केंद्रे वाढवली तरी देखील रोज नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्यावरच आहे. शनिवारी दोन हजार असणारा आकडा रविवारी १६३७ पर्यंत खाली आला असला तरी ही रोजची चढउतार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा दर १० पर्यंत खाली येणे अपेक्षित असताना तो १६ टक्क्यावर गेल्याने निर्बंध व लॉकडाऊनचे भूत पुन्हा किमान महिनाअखेरपर्यंत तरी मानगुटीवर बसले आहे.
जिल्ह्यात रविवारी संध्याकाळ पाचपर्यंतच्या अहवालानुसार १८ हजार ९५५ कोविड चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी १६३७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ७८० वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत १३५० जण कोरोनातून बरे झाले असून हा रुग्ण बरे होण्याचा दर ८९ टक्क्यांवर गेेला आहे.
जिल्ह्यात एका बाजूला संसर्गाचा आलेख वर-खाली होत असताना मृत्यूची ही परिस्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही. रविवारी ३३ जण मृत पावले, त्यात ३० जण जिल्ह्यातील तर उर्वरित तिघे परजिल्ह्यातील आहेत. मृत झालेल्यांमध्येही ६० वर्षांवरील १७ तर दीर्घकालीन आजाराचे १७ व रुग्णालयात दाखल केल्याच्या ४८ तासांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या ८ इतकी आहे.
चौकट
कोल्हापूर शहर अजूनही आघाडीवरच
सर्वाधिक रुग्णसंख्या व सर्वाधिक मृत्यूतही कोल्हापूर शहरच आघाडीवर आहे. खरेदीसाठीच्या गर्दीत विविध आंदोलनाच्या व कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वाधिक ३७९ रुग्ण व जिल्ह्यातील ३० पैकी तब्बल ११ मृत्यू हे शहर परिसरातील आहेत. त्यातही गजबजलेल्या शिवाजी पेठ, फुलेवाडी, राजारामपुरीतील मृत्यूची संख्या जास्त आहे.
चौकट
आज झालेले मृत्यू
कोल्हापूर शहर: ११ फुलेवाडी, नवीन वाशी नाका, गुरुजी वसाहत, आर.के.नगर, राजारामपुरी, शिवाजी पेठ, देवणे गल्ली, राजारामपुरी, फुलेवाडी, ताराबाई पार्क, शिवाजी पेठ
करवीर: ०४ कंदलगाव, वळीवडे, पाचगाव, मोरेवाडी,
राधानगरी: ०१ कसबा बाळवे,
शाहूवाडी: ०१ पटावडे,
शिरोळ: ०२ घोसरवाड,दत्तवाड,
हातकणंगले: ०९ हातकणंगले, इचलकरंजी, हिंगणगाव, हेर्ले, इचलकरंजी, तारदाळ, टोप, कोरोची, हालोंडी,
गडहिंग्लज: ०२ भडगाव, गडहिंग्लज,
इतर जिल्हा: ०३ सोनगिरी ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, हलापुरी ता. वाळवा. जि. सांगली, मत्तीवडे, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव