सध्या शहरात दररोज सरासरी तीन ते चार रुग्ण विविध प्रभागांमध्ये सापडत आहेत. कधी-कधी हा आकडा अचानक वाढतो. सध्या शहरात खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. सुसज्ज कोविड सेंटर नसल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची घरात राहून उपचार घेण्याची अधिक मानसिकता आहे. पण हे धोक्याचे आहे. या रुग्णांना शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
यातच परिसरातील ५० गावांतील लोक कोविडव्यक्तिरिक्त उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. त्यातच कोरोना प्रतिबंध लस वितरण, अँटिजन तपासणी यांमुळे येथील अधिकारी यांच्यावर ताण आहे. याचा विचार करून कोरोनासाठी अधिकचा अधिकारी वर्ग नेमून कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे आहे. मागील वर्षी आदमापुरात कोविड सेंटर होते; पण यावेळी ते नसल्याने मुरगूडमध्ये सेंटर होणे गरजेचे आहे.
दुसऱ्या लाटेतील शहरातील रुग्णसंख्या १०२ झाली असून यामधील ६६ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ३३ रुग्णावर उपचार सुरू असून यातील १७ रुग्ण सध्या घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे.