कोल्हापूर : टेंबलाईवाडी उड्डाणपुलाखालील रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेची धडक बसून खासगी परिचारिका महिलेचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. स्वाती नीलेश शिंदे (वय २७, मूळ रा. रेठरे बुद्रुक, सध्या रा. उंचगाव (ता. करवीर), असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताची नोंद रेल्वे पोलिस चौकीत झाली.
कराड तालुक्यातील रेठरे येथील मूळ रहिवासी असलेल्या स्वाती या काही दिवसांपूर्वी उंचगाव येथे भाड्याने राहण्यास आल्या. त्यांना एक लहान मुलगा आहे. पती पुणे येथे नोकरी करतात. चार दिवसांपूर्वी शिवाजी पार्कातील सेवाभावी संस्थेत त्या परिचारिका म्हणून नोकरीवर रुजू झाल्या. गुरुवारी दुपारी काम आटोपून त्या कार्यालयातून बाहेर पडल्या. पायी चालत त्या घराकडे जात होत्या. टेंबलाई उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळ ओलांडताना कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने त्या काही अंतरावर फरपटत गेल्या. त्यात त्या जागीच ठार झाल्या. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे उड्डाणपुलावर वाहनांची काही काळ कोंडी झाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविली. या अपघाताची नोंद रेल्वे पोलीस चौकीत झाली. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
फोटो : १८०२२०२१-कोल-स्वाती शिंदे (मृत)
फोटो : १८०२२०२१-कोल-गर्दी
ओळी : कोल्हापुरातील टेंबलाई रेल्वे उड्डाणपुलानजीक रेल्वेच्या धडकेत महिला ठार झाल्याचे समजताच गुरुवारी सायंकाळी बघ्यांची गर्दी झाली. (नसीर अत्तार)