गडहिंग्लज : फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी व वेतन फरकाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या गडहिंग्लज कारखान्याच्या चार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना (रविवारी, १४) सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ जानेवारीपासून सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर २८ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले. त्यानंतर ११ फेब्रुवारीपासून शिवाजी पाटील, आप्पासाहेब कांबळे, हणमंत चौगुले व विठ्ठल चुडाई यांनी उपोषण सुरू केले होते.
आज, (रविवारी) सकाळी उपोषणाच्या चौथ्यादिवशी तहसीलदार दिनेश पारगे व पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते साठी ओलांडलेले व काहींना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने त्यांना रुग्णालयात हलविले.
दरम्यान, सेवानिवृत्त कामागारांनी सोमवार (१५) रोजी गडहिंग्लज बंदची हाक दिली आहे. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.