कोल्हापूर : नायलॉन मांज्यामुळे आज दिवसभरात ५ घारी आणि एक कावळा जायबंदी झाले आहेत. कोल्हापुरातील पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. बागल हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.दिवसभरात ५ घारी आणि एक कावळा संक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवण्याऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या नॉयलॉन आणि चिनी मांज्यात मान, पंख आणि पाय अडकून जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आली होती.दलाच्या सुनील वायगंडे, संग्राम मोरे,अक्षय पाटील या जवानांनी या पक्ष्यांची त्यातून सुटका केली आणि पांजरपोळ येथे असलेल्या श्री पांजरपोळ संस्थेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉ. राजकुमार बागल यांनी उपचार केले. यातील दोन घारी गंभीर जखमी आहेत. दोरा अंगाभोवती गुंडाळल्यामुळे या घारींना अनेक ठिकाणी कापले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी साने गुरुजी येथून रावजी मंगल कार्यालयाजवळ एका झाडावर अडकलेल्या कावळ्याला तर कोंबडी बाजार, रंकाळा, ताराबाई पार्क, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी रोड अशा विविध परिसरातुन पाच घारींची मांज्याच्या दोरीत अडकल्यामुळे जखमी झालेल्या अवस्थेतुन सुटका केली. यामध्ये दोन पूर्ण वाढ झालेल्या घारी आहेत. जखमी झालेल्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या बामणी घारीच्या पिल्लाचाही समावेश आहे.
संक्रातीच्या दिवशी मांजा झाडात अडकतो. त्यामुळे दिवसभर फिरून पक्षी सायंकाळी जेव्हा आश्रयाला झाडावर येतात, तेव्हा त्यात अडकून अनेक पक्षी जखमी झाल्याचे समजू शकेल, त्यामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.- डॉ. राजकुमार बागल, कोल्हापूर