काेल्हापूर : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक ओबीसी महासंघाच्यावतीने शनिवारी (दि. १३) शाहू स्मारक भवनात ‘ओबीसी सक्षमीकरण परिेषद’चे आयोजन केल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, दिगंबर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशात ५२ टक्के ओबीसी समाज आहेण त्यातील बहुसंख्य श्रमिक आहे. मात्रए श्रमिकांचे शोषण सुरू असल्याने त्यांचे खच्चीकरण होते. सरकारी नोकऱ्या गेल्या. सहकारातील राखीव जागा गेल्या. सहकारी बँका मोडल्यामुळे पत गेली. सावकारी पाशात अडकले, बेकारी वाढली अशी अवस्था समाजाची झाली आहे. यासाठी ‘ओबीसी सक्षमीकरण’ हा नारा घेऊन महासंघाची वाटचाल सुरू आहे.
शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या सक्षमीकरण परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. श्रावण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत विविध ठराव संमत करण्यात येणार आहे. यावेळी अतुल दिघे यांच्या ‘संपत्तीचे निर्माते ओबीसी मागे का?’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याची माहिती लोखंडे व लोहार यांनी दिली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष धाेंडीबा कुंभार, एन. एस. मिरजकर, विनोद मुदगल उपस्थित होते.
परिषदेतील मागण्या -
२०२१ ची जनगणना ही जातवार व्हावी.
मतदारसंघांना इतर मागासवर्गीय जातींच्या बिंदु-नामावलीप्रमाणे आरक्षण द्या.
सहकारी संस्थांत मतदानाच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे.
खासगी उद्योग, विमा कंपन्यातही आरक्षण मिळावे.