कोल्हापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जर देशाचे पंतप्रधान असते, तर ‘ओबीसीं’च्या समस्याच राहिल्या नसत्या. म्हणून ओबीसी समाजाला आजही राजर्षी शाहूंची गरज आहे. किंबहुना आजचे हे अधिवेशनही घेण्याची गरज नव्हती, असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी शनिवारी येथे केले. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारानेच सेवा संघाची इथून पुढील वाटचाल राहील, असेही त्यांनी सांगितले. येथील मुस्लिम बोर्डिंग येथे ओबीसी सेवा संघाच्या सातव्या राज्य अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी गुजरातचे ओबीसी नेते जयंतीभाई मनानी, ज्येष्ठ संपादक सुनीलराव खोब्रागडे, आॅल इंडिया मुस्लिम आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ओबीसी सेवा संघाच्या महिला अध्यक्ष मालती सुतार, डी. ए. दळवी, प्रा. डॉ. महेंद्र धावडे, चंद्रकांत बावकर, प्राचार्य प्रकाश कुंभार, नरेंद्र गद्रे, सुलोचना नायकवडे, नंदकुमार वळंजू, आदींची प्रमुख होती. दरम्यान, सकाळी नऊ वाजता संविधान दिंडीचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. बिंदू चौक ते मुस्लिम बोर्डिंग अशी ही दिंडी काढण्यात आली. ढोबळे म्हणाले, राजर्षी शाहूंनी स्वातंत्र्यापूर्वी ४० वर्षे आरक्षण दिले; परंतु ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ४० वर्षे झगडावे लागले. देशातील लोकशाहीने ‘एक व्यक्ती व एक मत’ असा अधिकार दिला आहे. मग आम्ही ६० टक्के असूनही आरक्षणासाठी आम्हाला ४० वर्षे संघर्ष करावा लागत आहे. ओबीसी समाजातील एखादा मंत्री होऊन जातो म्हणजे समाजाचा विकास झाला असे नाही; तर प्रशासनातील उच्च पदांवरही या समाजाने असले पाहिजे. ओबीसींची लोकसंख्या ६० टक्के असूनही ‘आयएएस’ अधिकाऱ्यांचे प्रमाण फक्त ४ टक्केच आहे. जयंतीभाई मनानी म्हणाले, शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे जातीयवाद्यांच्या हातात आहेत. आमची लढाई ही जातीयवादाच्या विरोधात आहे. ओबीसींच्या बैठकीत त्यांच्या विषयीच चर्चा झाली नाही, तर त्या प्रवर्गाला कसा न्याय देता येईल. सुनील खोब्रागडे म्हणाले, ज्यांचे हक्क नाकारले गेलेत त्यांनीच देशात सर्वप्रथम आपल्या हक्कांची मागणी केली आहे. यानंतर दिवसभरातील सत्रात ‘ओबीसी महिलांची दशा व दिशा’, ‘ओबीसी एकतेला पर्याय नाही’, ‘ओबीसींसमोरील आव्हाने’ अशा विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, राज्य सचिव दिगंबर लोहार यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वळंजू यांनी मनोगत व्यक्त केले. उपरे यांना मरणोत्तर कर्मवीर पुुरस्कार प्रदान कालकथित हणमंत उपरे यांना मरणोत्तर ‘कर्मवीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अमरसिंह ढाका यांनी तो स्वीकारला.(प्रतिनिधी)
‘ओबीसीं’ना ‘शाहूं’ची आज खरी गरज
By admin | Published: May 17, 2015 1:11 AM