कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १८ टक्के लोकांना लठ्ठपणाचा विकार असल्याचे इंडस हेल्थ प्लसने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या ट्रेण्ड रिपोर्टमधून दिसून आले आहे.
कोल्हापूरमधील एकूण १००५ लोकांच्या नमुना गटाचा अभ्यास करण्यात आला व या ठिकाणच्या लोकांमध्ये बी-१२ जीवनसत्वाची कमतरता (२५ टक्के), मधुमेह (२४ टक्के), डिस्लिपिडेमिया (१८ टक्के), लठ्ठपणा (१८ टक्के) या आजारांपाठोपाठ ॲनेमिया (११ टक्के) आणि हृदयविकार (४ टक्के) जडण्यास पूरक स्थिती असल्याचे दिसून आले. गुणसूत्रांच्या रचनेसारखी काही बदलता न येण्याजोगी धोक्याची कारणे आणि त्यांना पर्यावरण, वय, लिंग, ताणतणाव आणि शारीरिक स्थिती, चयापचय क्षमता यांसारख्या व्यक्तिविशिष्ट कारणांची मिळालेली जोड यांमुळे या जीवनशैलीशी निगडित आजारांना सुरुवात होते
आरोग्यसेवातज्ज्ञ अमोल नाईकवडी म्हणाले, “मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारखे जीवनशैलीशी निगडित आजार हे कोविडचा धोका मोठ्या प्रमाणात वाढविणारे आहेत आणि म्हणूनच विशेषत: सध्याच्या काळामध्ये या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”