कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या राजकारणाची पातळी आता कुटुंबांतील मुलींना अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत पत्र पाठविण्यापर्यंत पोहोचली आहे. या राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या मुलीला वडिलांबाबत हे निनावी पत्र पाठविण्यात आले आहे. याविरोधात तिने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.चित्रपट महामंडळाच्या यापूर्वीच्या कार्यकारिणीच्या कारभारावरून गेली आठ वर्षे वादंग आणि राजकारण सुरू आहे. व्यवहारांच्या न्यायालयीन चौकशीपासून ते विनयभंगाची तक्रार दाखल करण्यापर्यंत याची मजल गेली. हेच कमी होते की काय म्हणून आता मिलिंद अष्टेकर यांच्या मुलीला यात निष्कारण ओढले आहे.
१० दिवसांपूर्वी त्यांच्या विवाहित मुलीला निनावी पत्र पाठविण्यात आले असून, त्यात वडिलांबद्दल अत्यंत घाणेरड्या आणि लज्जास्पद भाषेत भाष्य करण्यात आले आहे. अश्लील छायाचित्र टाकले आहे. त्यावर ‘आम्ही कोल्हापूरकर सभासद, खासबाग’ असा शिक्का मारला आहे.हा वाद महामंडळातील आहे, सभासदांमधला आहे; त्यामध्ये कुटुंबीयांना गोवण्यापर्यंतची त्याने खालची पातळी गाठली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अष्टेकर यांना अशाच भाषेतील निनावी पत्रे पाठविली जात आहेत. आजवर अशी १५ पत्रे आली असून, याविरोधात त्यांनी महामंडळाकडे तक्रारही केली होती. मात्र महामंडळाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. म्हणून त्यांच्या मुलीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात महामंडळाच्या राजकारणात माझ्या वडिलांना अथवा कुटुंबीयांना काही झाल्यास त्याला महामंडळ जबाबदार असेल, असे म्हटले आहे.कोल्हापूर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची जननी. असा नावलौकिक गाजविलेल्या याच शहरातील चित्रपट व्यावसायिक आता एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करण्यात गुंतले आहेत. त्यात वरून ‘आम्ही कोल्हापूरकर’ असे लिहून जणू काही पराक्रमच गाजविल्याचा आविर्भाव आहे.
या कलानगरीतील मराठी चित्रपट व्यावसायिकांची शिखर संस्था म्हणून मिरविणाऱ्या या संघटनेची कोल्हापुरात ज्या पद्धतीने अब्रूची लक्तरे वेशीला टांगण्यात येत आहेत, ते पाहता आम्ही ही संस्था स्थापन का केली, असे म्हणण्याची वेळ या ज्येष्ठ सिनेव्यावसायिकांवर आली आहे.