भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शहरातील जुन्या म्हणजे ३० वर्षे पूर्ण झालेल्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासात अडथळ्यांची भिंत मोठी असल्याचे समोर आले आहे. म्हणून वर्षभरात केवळ १० अपार्टमेंटधारकांनी पुनर्विकासासाठी महापालिका नगर प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. परिणामी नवीन अपार्टमेंटची संख्या वाढत आहे. मात्र आयुर्मान संपलेल्या अपार्टमेंटची पुनर्बांधणी रखडली आहे.शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास ३० वर्षांनंतर करता येतो. बांधकाम मोडकळीस आलेले असेल, धोकादायक असेल तर ३० वर्षे पूर्ण होण्याआधीही पुन्हा बांधणी करता येते. पण पुनर्विकास करताना शहरातील अपार्टमेंटधारकांना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागत आहे. काही अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता ९ मीटर रुंदीचा आहे. रस्त्याची रुंदी कमी राहिल्याने तर एफएसआय कमी मिळत असल्याने बिल्डर तेथील जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास करण्यास पुढे येत नाही.याशिवाय अपेक्षा वाढल्याने अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांचे एकमत होत नाही. पाडून बांधल्यानंतर नवीन फ्लॅट सध्यापेक्षा मोठा हवा असतो, पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच पाहिजे, असा हट्ट असतो, अशा अनेक अपेक्षा असतात. परिणामी अपार्टमेंटला ३० वर्षे पूर्ण झाली तरी अपार्टंमेट पुनर्विकास होत नसल्याचे शहरात चित्र आहे.
ताराबाई, नागाळा पार्क परिसरात अधिक..जुने अपार्टमेंट किंवा मोठा बंगला पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक सेवा, सुविधांयुक्त अपार्टमेंट बांधण्याचे प्रमाण ताराबाई, नागाळा पार्क आणि उपनगरात अधिक आहे. या भागात वर्षभरात आठ अपार्टमेंटच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना तर पेठा, शाहपुरी, राजारामपुरी अशा परिसरात दोन असे एकूण १० प्रस्तावांना महापालिकेच्या नगर प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.
अनुभव असेही..जुन्या फ्लॅटपेक्षा किमान २५ टक्के जास्त जागा द्यावी, पार्किंग फ्री आणि बांधकाम सुरू असल्याच्या काळात फ्लॅटधारकांना भाडे असा प्रस्ताव दिला तरी सभासद काही ठिकाणी ते मान्य करत नसल्याचे अनुभव आहेत. वाढवून देणारी जागा २५ टक्के बिल्डर देईलच कशावरून, अशी शंका उपस्थित केली जाते. अपार्टमेंटमध्ये दहा विचारांचे दहा लोक असतात. त्यांच्यातच मुळात एकमत करणे ही डोकेदुखी असते. त्यातील एखादा माणूस हेकड स्वभावाचा असला तरी सर्वच प्रक्रिया ठप्प होते.
असाही पर्याय..फ्लॅटधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत असेल तर त्यांनाही स्वत: अशी इमारत विकसित करता येते. परंतु आपल्याकडे इमारत पूर्ण झाल्यावर अशा सोसायट्या स्थापन झालेल्या नाहीत. त्या सोसायटीसाठी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला लागतो. परंतु बऱ्याचदा दाखला घेतलेला नसतो. बँकेत खाते हवे आणि त्यावर वर्षभर व्यवहार झालेले असावेत, परंतु खाते काढण्यासाठीच कागदपत्रांची यादी मोठी आहे. त्यामुळे या मार्गानेही विकास करणे अडचणीचेच ठरत आहे.
जुने अपार्टमेंट किंवा बंगले पाडून त्या ठिकाणी बिल्डर नवीन अपार्टमेंट बांधताना अधिकाधिक आधुनिक सेवा, सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. याचा विचार करण्याऐवजी मला पूर्वीपेक्षा अधिक मोठा फ्लॅट कसा मिळेल, याचाच अधिक विचार सदस्य करतात. परिणामी जुन्या अपार्टमेंटचा पुनर्विकास होताना दिसत नाही. -डॉ. विजय पाटील, चार्टर्ड इंजिनिअर, कोल्हापूर
शहरातील अनेक भागातील जुन्या अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता ९ मीटर किंवा त्यापेक्षा कमी रुंदीचा आहे. अशा ठिकाणचे अपार्टमेंटचा पुनर्विकास करताना बिल्डरला एफएसआय कमी मिळतो. तो वाढवून द्यावा, अशी शासनाकडे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास पुनर्विकासास गती येईल. -कृष्णात खोत, अध्यक्ष क्रेडाई, कोल्हापूर