कोल्हापूर : पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे यंदा सार्वजनिक गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर असल्याने विसर्जन करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार असल्याने पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत गणपती विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका सूत्रांनी केले आहे.पंचगंगा नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला असून, पाण्याची पातळी ३९ फूट ११ इंचावर आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती स्थिर असून, नदीचे पाणी ओसरण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी पुराचे पाणी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याच्या पुढे होते.
पंचगंगा घाट पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. शिवाय गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता वाहतुकीस बंद होता; त्यामुळे अशा परिस्थितीत गणपती विसर्जन अशक्य आहे. शिवाय मिरवणुकीतील वाहने विसर्जन झाल्यानंतर शिवाजी पूल, जुना बुधवार तालीममार्गे सोडली जातात. मात्र गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्यावर पाणी असल्याने तेथून पुढे वाहने नेणेही धोक्याचे आहे.पुराचे पाणी ओसरल्यानंतर तत्काळ जामदार क्लब ते पंचगंगा नदीघाट परिसरातील स्वच्छता, गाळ बाजूला करणे हे एक आव्हान आहे. जरी आज बुधवारी, दुपारपर्यंत पाणी ओसरले तरीही कमी वेळात सुविधा निर्माण करणे अशक्य आहे. म्हणूनच पुराचे वाढलेले पाणी, वाहतुकीस रस्ता बंद असल्यामुळे गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहे.शहरातील पूरस्थिती पाहता यंदा सर्वच मंडळांनी आपले गणपती पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. इराणी खणीवर विसर्जनाकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच तेथे लोखंडी बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावर तसेच विसर्जनस्थळी लागणाºया अत्यावश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत करून देण्यात आलेल्या आहेत.विसर्जन तयारी युद्धपातळीवर -
- विसर्जन मार्गावरील रस्ते पॅचवर्क सुरू
- विसर्जन मार्गावर पथदिव्यांची दुरुस्ती पूर्ण
- शहरात विविध ठिकाणी २०० नवीन एलईडी बल्ब लावले.
- शहरात पोलिसांकरिता १० टेहाळणी मनोरे
- अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या
- पानसुपारी व निरोपाचे नारळ देणाऱ्या मंडळांना परवानगी
- इराणी खण येथे बॅरिकेटस्, वीजेची सोय
- अग्निशमन दलाची पथके असणार तैनात
- २४ तास रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा
हॉकी स्टेडियममार्गे सोडणारज्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता विसर्जनासाठी जायचे आहे, ती मंडळे सावित्रीबाई फुले रुग्णालय ते हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, देवकर पाणंदमार्गे इराणीकडे जाऊ शकतात. त्यांना तो खुला असेल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.