कोल्हापूर : आबालवृद्ध भक्तांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांची जयंती आज, मंगळवारी सर्वत्र साजरी झाली. यानिमित्त शहरातील ओढ्यावरील गणेश मंदिरासह विविध मंदिरांची रंगरंगोटी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक विधी व जन्मकाळ सोहळ्यास प्रारंभ झाला. अनेक भाविकांनी पहाटेच गणेशाचे दर्शन घेतले. दुपारी अनेक ठिकाणी महाप्रसाद आहेत तर सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.श्री गणेश जयंती उत्सवांतर्गत ओढ्यावरील गणेश मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कार्यक्रम आयोजित केले असून, पहाटे पाच वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला तर नऊ वाजता अलंकार पूजा पार पडली.
सामुदायिक अथर्वशीर्ष पठणानंतर दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी ‘श्रीं’चा जन्मकाळ सोहळा पार पडला. दुपारी साडेबारा वाजता आरती व त्यानंतर लाडू प्रसाद वाटण्यात आले. उद्या, बुधवारी ‘देवाचिये द्वारी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.शुक्रवार पेठेतील न्यु शिवनेरी तरुण मंडळातर्फे गणेश जयंती महोत्सव होत असून, पहाटे साडेसहा वाजता श्री शिवगणेश मूर्तीस महाअभिषेक व पूजा करण्यात आली. साडेआठ वाजता श्री गणेशयाग तर दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी श्री गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला.महोत्सवांतर्गत ३ फेब्रुवारीपर्यंत महाआरती, भजन, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.