कोल्हापूर : महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शेंग, मेथी, चाकवतचा दर निम्म्यावर आला होता. मार्च सुरू झाल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे द्राक्षे, अननसाच्या दरांत वाढ झाली आहे.कोल्हापुरात कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, शाहूपुरीजवळील रेल्वे फाटक बाजारात सणानिमित्त सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. शाबू, रताळे, बटाटा, केळी, वरी, राजगिरा, राजगिरा लाडू खरेदीसाठी गर्दी होती; पण यंदा रताळ्यांची आवक कमी असल्याने दरावर परिणाम झाला होता. रताळे ४० पासून ते ६० रुपयांपर्यंत होते.
शाबू ५७ वरून ६० रुपये प्रतिकिलो, वरी ८० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये, राजगिरा ८० रुपये, राजगिरा लाडू पॅकेट (१२ नग) २० रुपये दर होता. तसेच फळांनाही मागणी होती. त्याचे दरही वाढले होते. गेल्या आठवड्यात असलेला सफरचंदांचा ८० रुपयांचा दर १०० रुपयांवर गेला होता.पेरू ८० रुपयांवरून १०० ते १२० रुपयांच्या घरात होता. केळी ३० रुपयांवरून ४० रुपये झाली होती. डाळिंब ८० रुपये असे दर होते. मात्र चिकू व मोसंबीचा दर स्थिर होता. पेरू ४० रुपये तर मोसंबी ८० रुपये होते. सणानिमित्त केळींची आवक मोठ्या प्रमाणात आली होती. त्यामुळे बाजारात केळींचे ढीगच्या ढीग होते.याचबरोबर कोबी, टोमॅटो, गवार, ओला वाटाणा, वरणा, फ्लॉवर, शेवग्याची शेंग, बीट, तोंदलीच्या दरात वाढ झाली आहे; तर वांगी, ओली मिरची, मुळा, ढबू मिरची, कारली, भेंडी, बिनीस, दुधी भोपळा, कांदापात, चाकवताच्या दरात घसरण झाली आहे. तसेच साखर ३६ रुपये, हरभराडाळ ७० रुपये, मूगडाळ ८८ रुपये, मसूरडाळ ६४, उडीदडाळ ८४ ते ८८ रुपये असा दर होता.
काकडी, गाजरात वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने काकडी, गाजराला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात काकडी २५ रुपये प्रतिकिलो, गाजर २० रुपये किलो असा दर होता. याचबरोबर दह्यालाही मागणी वाढली आहे.
आंब्यांचे दर असे :
- आंबा हापूस - दोन हजार रुपये पेटी
- आंबा हापूस- बॉक्स ५०० रुपये
- आंबा लालबाग- बॉक्स २५० रुपये