कोल्हापूर दि. 21 : कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म.आ.लवेकर यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 379 वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या 3 फैऱ्यांची सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने बिगूल वाजवून मानवंदना दिली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, वसंतराव मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. म. आ. लवेकर म्हणाले, पोलीसांना नुसतीच कायदा व सुव्यवस्था पहावी लागत नसून हिंसाचारी, गुन्हेगारी, दहशतवादी आणि समाजद्रोही यांच्याशीही सामना करावा लागतो. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचे सुरक्षा व संरक्षण करण्याचे महान कर्तव्य करीत असताना दरवर्षी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व शिपायांना आपले प्राण गमवावे लागतात, त्यांच्याप्रती आपण नेहमीच आदर व्यक्त करणे, आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
लडाख येथे 20 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान बेपत्ता झाल्याने, त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 22 जवानांची एक तुकडी 21 ऑक्टोंबररोजी गेली होती. या तुकडीवर हॉटस्प्रिंग या ठिकाणी चिनी सैनिकांची अचानक शस्त्रानिशी जोरदार हल्ला चढविला, या हल्यात शोधतुकडीतील 10 जवान मृत्युमूखी पडले, 5 जवान जखमी झाले तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले.
शत्रुशी निकराची लढत देतांना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेंव्हापासून 21 ऑक्टोंबर हा दिवस देशातील पोलीस दलाच्यावतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागील एक वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना अदरांजली वाहण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सकाळी 8 वाजता पोलीस कवायत मैदानावर पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी गतवर्षी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या देशातील 379 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नावे राष्ट्रीय पोलीस दिन संचलनात वाचली जावून स्मृतीस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय,निवृत्त पोलीस अधिकारी, तसेच नागरीक उपस्थित होते.