कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुऱ्हाळघरे बंद पडली, तर वीज नसल्याने उद्यमनगरसह कोल्हापूर शहरातील विविध छोट्या-मोठ्या उद्योगांची चाके थंडावली. एकाच दिवसात जिल्ह्यात १३७.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात दमदार पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम झाला आहे. उसाची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे उसाची रिकव्हरी कमी पडणार असल्याने त्याचा फटकाही कारखान्यांना बसणार आहे. ढगाळ हवामान व पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. वेलवर्गीय पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळघरांचा हंगामही अंतिम टप्प्यात आहे. अचानक आलेल्या पावसाने गुऱ्हाळमालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उसाच्या तोडण्या थांबल्या, जळण भिजले आहे. त्यातच खराब हवामानामुळे गुळाच्या रंगावर परिणाम झाल्याने गुऱ्हाळमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा आंब्यासह इतर फळांच्या मोहरावर परिणाम झाला आहे. या पावसाचा फटका वीट व्यावसायिकांनाही बसला. (प्रतिनिधी)साताऱ्यात आंबा, द्राक्षाचे नुकसानसातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटण, कऱ्हाड, फलटण, जावळी, वाई, खंडाळा, माण, खटाव परिसरात रात्रभर व रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. आंब्याचा मोहर गळाला असून द्राक्ष बागा, स्ट्रॉबेरी, गहू आले, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते. हे पीक आता हातातोंडाशी आले असतानाच शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकांना माती लागली आहे. त्यामुळे फळाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी झोपली आहे.
अवकाळीने कोट्यवधींचा फटका
By admin | Published: March 01, 2015 10:48 PM