कोल्हापूर : सीमा भाग हा महाराष्ट्राचा भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलासाठी महिनाभरात जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. यावर लवकरात लवकर बांधकाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्री सामंत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सीमा भाग महाराष्ट्राचाच असल्याने तेथील विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने येथे कौशल्य विकासावर आधारित शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाने संस्थेचे नाव ठरवून त्यासाठी भाड्याने जागा घेतली आहे. येथे विविध प्रकारच्या पाच कोर्सेसना मान्यता देण्यात आली असून, अन्य कर्मचारी व पाच प्राध्यापकांची भरतीदेखील करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी या संकुलासाठी शासनाकडून जागा घेण्यावर चर्चा झाली होती. जागेची पाहणी झाली असून, महिनाभरात त्याचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यावर कशा पद्धतीने बांधकाम करायचे याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाईल.महाविद्यालये बंद होणार हा गैरसमजमंत्री सामंत म्हणाले, सीमा भागातील आर्ट, कॉमर्स, बीएस्सीची महाविद्यालये बंद होणार, असा गैरसमज झाला होता किंवा तो पसरवला गेला असेल; पण शासनाचा असा कोणताही विचार नाही, उलट तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी ३ कोटीशिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी आम्ही ५० लाखांची घोषणा करून १ कोटीपर्यंत निधी देऊ असे जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अध्यासनासाठी ३ कोटी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यापुढचे पाऊल टाकत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून ग. गो. जाधव अध्यासनासाठी ५० लाखांचा निधी दिला आहे. शासनाकडूनदेखील जे ५० लाख देण्यात येणार आहेत, त्या निधीबाबतदेखील पुढील १०-१२ दिवसांत निर्णय होईल.--