कुरुंदवाड : येथील पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शौचालययुक्त परीक्षणातून शहराला केंद्राचा ओडिएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहराने स्वछ सर्वेक्षण अभियानात सहभागी होऊन मानांकन मिळविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालिका पदाधिकारी, नगरसेवक, विविध मंडळे या उपक्रमात सहभागी होत असल्याने शहराची स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत जल, वायू, अग्नी, भूमी, आकाश या पंचतत्त्वांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी पालिका प्रशासनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून काही सुज्ञ नागरिक, मंडळे वृक्षारोपण, शहरासह घाटस्वच्छतेचा उपक्रम राबवत आहेत.
हागणदारीमुक्त शहराची गत महिन्यात केंद्रीय पथकाने पाहणी केली. यामध्ये पालिका प्रशासनाने शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी नागरिकांत प्रबोधन, अनुदान देण्याबरोबर सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखली जात आहे. या उपक्रमाची तसेच शहरवासीयांकडून मिळत असलेला प्रतिसाद याचे पथकाने मूल्यमापन करत समाधान व्यक्त केले. या मूल्यमापनाचा निकाल घोषित झाला असून, पालिकेला हागणदारीमुक्तमध्ये मानांकन मिळाले आहे. यासाठी नगराध्यक्ष जयराम पाटील, उपनगराध्यक्ष फारुख जमादार, मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.