गारगोटी : भुदरगड तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, बुधवारी दिवसभरात सरासरी १४५ मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून वेदगंगा नदी धोक्याच्या पातळी जवळ आली आहे.
कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. गेल्या चोवीस तासांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. गावातील गटर्स, ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतीचे बांध तुटले असून शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पांगिरे येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. गारगोटी-कोल्हापूर मार्गावर कूर येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण, गारगोटी, म्हसवे, करडवाडी, शेळोली, शेणगाव हे कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाटगाव धरण ७४.३१% भरले असून कोणताही विसर्ग सुरू केलेला नाही.
पाटगाव मध्यम प्रकल्प (मौनी जलाशय)
पाणी पातळी – ६२३.२४ मी. एकूण पाणीसाठा–७८.२१ द.ल.घ.मी (२७६१.९८ द.ल.घ.फू.)
टक्केवारी - ७४.३१%. पाण्याखाली गेलेले बंधारे-वाघापूर, निळपण, गारगोटी, म्हसवे, करडवाडी, शेळोली, शेणगाव.
२२ भुदरगड पाऊस
कूर येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असतानाही वाहनांची ये-जा सुरूच होती.