कोडोली : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करून मुलगी असल्याच्या कारणावरून अवैध गर्भपात केल्याप्रकरणी हरपवडे (ता. पन्हाळा) येथील डॉ. तानाजी शिवाजी पाटील व सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरवर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पाटील याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मोहरे (ता. पन्हाळा) येथील महिला चौदा आठवड्यांची गरोदर असल्याने हरपवडे (ता. पन्हाळा) येथील डॉ. तानाजी पाटील याच्याकडे तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी गर्भलिंग निदान करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर आपल्या ओळखीचे सोनोग्राफी करणारे डॉक्टर असल्याचे पाटील यांनी संबंधित दाम्पत्यास सांगितले. २९ नोव्हेंबरपर्यंत मोहरे येथे व सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांच्या घरी व डॉ. पाटील यांच्या कोल्हापूर येथील रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर पोटातील गर्भ हा स्त्री भ्रूण असल्याचे सांगितले. कायद्याने गर्भलिंग हे पुरुष की स्त्रीचे आहे हे सांगण्यास तसेच तपासण्यास बंदी असतानाही सोनोग्राफी करण्याऱ्या डॉक्टरांनी हे कृत्य करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी गर्भपात केल्यानंतर महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने या रुग्णालयामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना याबाबत तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या.डॉ. पाटील यांच्याकडे गर्भपात करण्याची कोणतीही शैक्षणिक अर्हता नाही. तसेच त्याचे कळे (ता. पन्हाळा) व गोखले कॉलेजजवळील रुग्णालय हे कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नाहीत. अवैद्य गर्भपात केल्यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांनी कोडोली पोलिसांत दाखल केली आहे. संशयित आरोपी डॉ. तानाजी पाटील यांना कोडोली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पन्हाळा न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. शरद मेमाने तपास करीत आहेत.डॉक्टरकडून लॅपटॉप जप्तसोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांचे नाव डॉ. पाटील यांनी अद्याप पोलिसांना सांगितलेले नाही. पाटील याच्या कळे येथील रुग्णालयाची झडती घेतली. यात तेथील लॅपटॉप जप्त केला आहे.
गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा
By admin | Published: December 13, 2015 1:21 AM