कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रसाद राजेंद्र पवार (रा. वर्षानगर, सुभाषनगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, समाजविघातक मेसेज तयार करणारे आणि व्हायरल करणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे.
जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. सोशल मीडियाची पाहणी करताना वर्षानगर येथील प्रसाद पवार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी करणारा मेसेज तयार करून तो काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने संबंधित मेसेज सोशल मीडियातून हटवून पवार याला ताब्यात घेतले. हेतूपूर्वक पंतप्रधान मोदी यांची बदनामी केल्याबद्दल राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हेड कॉन्स्टेबल विजय यशवंत पाटील यांनी फिर्याद दिली.