कोल्हापूर : येथील अर्पण ब्लड बॅँकेच्या चुकीच्या कामकाजाची दखल घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने बॅँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. गेल्या महिन्यातही अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या ब्लड बॅँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली होती. सातत्याने या बॅँकेला नोटीस निघत असल्याने या ब्लड बॅँकेचे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
गेल्या तीन वर्षांत चार वेळा या ब्लड बॅँकेला नोटिसा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.लक्ष्मीपुरीतील सरोज अपार्टमेंटमध्ये यशोदर्शन सामाजिक विकास मंडळ संचलित अर्पण ब्लड बँके चे कामकाज चालविले जाते. मात्र अधिकाधिक रक्त संकलित करण्यासाठी या बॅँकेकडून चुकीच्या पद्धतीने कामकाज केले जाते. तसेच रक्तदात्यांनाही नंतरच्या काळात योग्य वागणूक दिली जात नाही. त्यांना रक्ताची गरज भासल्यास त्यावेळीही टाळाटाळ केली जाते, अशा तक्रारी होत होत्या.
जानेवारी २०१९ मध्ये अर्पण ब्लड बँकेच्या वतीने हुपरीमध्ये रक्तसंकलन करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘रक्तदान करणाºयास सॅक फ्री’ अशी पोस्टरवर जाहिरातबाजी करण्यात आली होती. याबाबत काहींनी रक्तदात्यांना आमिष दाखविल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे केल्या होत्या.त्या अनुषंगाने तत्कालीन औषध निरीक्षक शामल मैंदरकर, औषध निरीक्षक महेश गावडे आणि ‘सीपीआर’मधील जिल्हा रक्त संकलन अधिकारी डॉ. राजेंद्र मदने यांनी चौकशी करून बॅँकेकडून खुलासा मागविला होता. तो न दिल्याने ब्लड बॅँकेचा परवाना तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आला होता. आता या सर्व प्रकाराची दखल घेत राज्य संक्रमण परिषदेने अर्पण ब्लड बॅँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याबाबत ब्लड बॅँकेची बाजू समजून घेण्यासाठी कार्यालयात फोन केला असता त्यांनी व्यवस्थापक बाबासाहेब आघाव यांचा मोबाईल नंबर दिला. त्यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे सांगून ब्लड बॅँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. राजेंद्र चिंचणीकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.