कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी जालना येथील एका अध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी तब्बल ४७ तोळ्याचा चोख सोन्याचा किरीट अर्पण केला. हा किरीट देवीला अलंकार पूजेदरम्यान शनिवारी चढवण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे श्री अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे आणि धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी ही माहिती दिली.जालना येथील एका अध्यात्मिक संस्थानच्या पुजारी आणि पाच ते सहा पदाधिकाऱ्यांनी संस्थानचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे गुप्तदान दिले. त्यांनी शुक्रवारी दुपारी स्वत: येऊन हा किरीट देवीला अर्पण केला आणि गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेतले. ४७० ग्रॅम वजनाच्या या किरीटाची किंमत आजच्या बाजारभावानुसार २४ लाख रुपये आहे. हा किरीट देवस्थान समिती कार्यालयात व्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात आला. समितीमार्फत या भाविकांचा साडीचोळी आणि प्रसाद देउन सत्कार करण्यात आला.
सोन्याचा दुसरा किरिट देवीच्या खजिन्यातदेवीला यापूर्वीही कोलकाता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरिट अर्पण केला होता. त्यानंतर आता हा ४७ तोळ्याचा सोन्याचा दुसरा किरीट देवीच्या खजिन्यात जमा झाला आहे. गुरुवारीही कऱ्हाड येथील अभिजित पाटील या भाविकाने ५० ग्रॅम वजनाचा सुवर्णहार देवीच्या चरणी अर्पण केला होता.
खजिन्यात भर
अंबाबाईच्या खजिन्यात सातत्याने सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची भर पडत असते. यात निजामकालीन तसेच संस्थानकालीन अनेक दागीने, देवीच्या नित्यालंकाराचा समावेश आहे. खजिन्यात सुमारे शंभर किलोहून अधिक सोने आणि एका टनापेक्षा जास्त चांदी आहे. गर्व्हमेंट व्हॅल्युएटरमार्फत देवीला अर्पण केलेल्या सर्व मौल्यवान दागिन्यांची तपासणी केल्यानंतर ते खजिन्यात जमा केले जाते. या खजिन्याची देखभाल एक कुटूंब गेल्या तीनशे वर्षाहून अधिक काळ करत आहे.