कोल्हापूर : वाणिज्य प्रकारातील विद्युत जोडणी बंद करुन कुळाच्या नावे नवीन विद्युत जोडणी करण्यासाठी साडेपाच हजार रुपयाची लाच घेणारा शेंडा पार्क विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायक जीवन महादेव कांबळे (वय-30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आज सापडला.तक्रारदार प्रमोद नारायण कदम (रा. जवाहरनगर हौसिंग सोसायटी) यांना घरामध्ये असणाऱ्या जोडणीचे वाणिज्य वापरासारखे वीज बील येत होते. म्हणून तक्रारदार यांनी वीज मीटरच्या वापरात बदल करण्यासाठी कांबळे यांची भेट घेतली.
वाणिज्य प्रकारातील मीटर बंद करुन त्या ठिकाणी भाडेकरुच्या नावे नवीन जोडणी घ्यावी लागेल असे सांगून कांबळे यांनी साडेपाच हजार रुपयाची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने 26 सप्टेंबर रोजी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 27 तारखेला शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता साडेपाच हजार रुपये मागितल्याचे निष्पण झाले.शेंडा पार्क येथील कार्यालयात लावण्यात आलेल्या सापळयात साडेपाच हजार रुपये स्विकारल्यानंतर कांबळे याला रंगेहात पकडण्यात आलं. पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलीस नाईक नवनाथ कदम, मयुर देसाई, सुरज अपराद या पथकाने ही कारवाई केली.लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, संपर्क क्रमांक 0231-2540989, 9011228333 टोल फ्रि हेल्पलाईन 1064 आणि 7875333333 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.