लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला तेरवाड बंधारा येथे दोरखंडाने बांधून घातल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (हेरवाड, ता. शिरोळ), विश्वास बालीघाटे (रा. शिरढोण) व अनोळखी तिघे अशा एकूण पाच जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन जनार्दन हारबड यांनी दिली आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते फरार झाले असून न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हारबड बुधवारी (दि. २३) पंचगंगा नदीपात्रातील मृत मासे व दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी आले होते. कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा आणत बंडू पाटील व बालीघाटे व अन्य तिघांनी मला दोरखंडाने बंधाऱ्याच्या पिलरला बांधून घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.