भारत चव्हाण
कोल्हापूर : घरफाळा घोटाळा प्रकरणात झालेली फौजदारी तसेच निलंबनाची कारवाई, घोटाळ्यातील सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुढे येत असलेली नावे, माहिती अधिकारात मागितली जाणारी माहिती, काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा होत असलेला सततचा हस्तक्षेप व दादागिरी, अधिकाऱ्यांवर होत असलेले थेट आरोप यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी सध्या प्रचंड अस्वस्थ असून, मोठ्या तणावाखाली काम करत आहेत.
गेली तेरा महिने महानगरपालिकेत प्रशासकांकडून कारभार सुरू आहे. प्रशासक आले की अधिकाऱ्यांचे राज्य निर्माण होईल, जनतेची कामे होणार नाहीत, असे एकंदरीत चित्र होते. परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानीला पूर्णत: चाप बसला आहे. त्याला कारण महापालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळ्याचे आहे. पालिकेत प्रशासक कारकीर्द सुरू होण्याआधीपासून घरफाळा घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्यामुळेच या विभागासह अन्य विभागातही अधिक अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महापालिकेत अनेक घोटाळे झालेे; पण त्याची नुसती चर्चा झाली. कारवाई काहीच झाली नाही. मात्र घरफाळा विभागातील घोटाळा याला अपवाद ठरला. चौदा प्रकरणाच्या तक्रारी आल्या असल्या तरी चौकशी करताना ‘मारुतीच्या शेपटी’सारखी घोटाळ्याची साखळी वाढतच आहे. चौघांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदार झाली, आता आणखी चार अधिकारी, कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे या विभागात सध्या सन्नाटा आहे. अस्वस्थता आहे. आपलंही काही तरी बाहेर निघेल या विवंचनेत अनेक कर्मचारी, अधिकारी आहेत.
- माहिती मागितली की पडतात आजारी
घरफाळा घोटाळ्यासंबंधी काही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली किंवा चौकशीच्या अनुषंगाने कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती मागविली की लगेच घरफाळा विभागातील अधिकारी, कर्मचारी आजारी पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अधीक्षक दर्जाचे अधिकारी सतत आजारी रजा घेत आहेत. त्यामुळे चौकशीच्या कामातही व्यत्यय येत आहे.
-भूपाल शेटे, कदम बधूंमुळे हैराणभूपाल शेटे, सुनील कदम, सत्यजित कदम यांनी घरफाळ्यातील घोटाळ्यावर बोट ठेवले आहे. या तिघांनी पालिकेतील गैरकारभार चव्हाट्यावर आणला आहे. माहितीच्या अधिकारात मागणी केल्यानुसार माहिती द्यावी तरी अडचण आणि नाही द्यावी तरीही अडचण झाली आहे. दोन्ही बाजूने शिव्या, दरडावणे सुरू झाले आहे. रीतसर माहिती देतानाही अधिकाऱ्यांना घाम फुटत आहे.
विशिष्ट कार्यकर्त्यांची दादागिरी काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून आपली कामे सांगत आहेत. त्यांचे रोज महापालिकेत येणं सुरू आहे. कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा इशारा दिला जातो. अशाच एका अधिकाऱ्याने बदल्यांच्या माध्यमातून होणारी देवाण-घेवाण थांबविल्यामुळे त्यांच्या विरोधात विशिष्ट कार्यकर्त्यांनी अनेक दिवस मोहीमच उघडली होती. आजही या कार्यकर्त्यांचा उपद्रव सुरू आहे.
-अधिकाऱ्यांवरच आरोप यापूर्वी अनेकवेळा घोटाळ्यांवर चर्चा झाली; परंतु अधिकाऱ्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत; परंतु एक बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधलेल्या इमारतीला घरफाळा लावला नाही म्हणून दोन नागरिकांनी थेट आरोप केले. धोकादायक इमारत पाडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला. बेकायदेशीर कामे केली नाहीत म्हणून होणाऱ्या आरोपामुळे अधिकारी गडबडून गेले आहेत. आज एका अधिकाऱ्यावर झाला, उद्या आपल्यावरही आरोप होऊ शकतो, अशी भीती अनेकांच्या मनात आहे.