कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळालेला नसताना विधानसभेचा भत्ता तरी मिळतो की नाही, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला भारत निवडणूक आयोगाकडून कामकाज भत्ता दिला जातो; परंतु ही निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप अधिकारी व कर्मचाऱ्यांना भत्ता मिळाला नसल्याचे चित्र आहे. यातील मतदान व मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भत्ता देण्यात आला आहे, असा दावा जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे; परंतु याव्यतिरिक्त महिनाभर केलेल्या कामाचा भत्ता मिळाला नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.निवडणुकीच्या काळात भत्त्यावरून शिक्षकांनीही निवडणूक विभागासोबत वाद घातला होता. आता विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून लोकसभा निवडणुकीतीलच बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचा भत्ता अजून मिळालेला नाही. आता विधानसभेचा भत्ता तरी वेळेवर मिळणार काय, असा सवाल या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजातील मतदान व मतमोजणीचे भत्ते संबंधितांना अदा केले आहेत. फक्त अतिकालिक भत्ता हा दिलेला नाही; कारण यासाठी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरून माहिती जिल्हा निवडणूक विभागाला अद्याप आलेली नाही. ही माहिती आल्यानंतरच याबाबतचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवून भत्त्यासाठी निधीची मंजुरी घेता येऊ शकते.- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी