कोल्हापूर : जकात ठेकेदार फेअरडील कंपनीने लवादासमोर दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तसेच वकिलांनी हलगर्जीपणा केला आहे आणि त्यांच्या वरदहस्तामुळे महापालिकेच्या विरोधात निकाल गेला आहे अशांची चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरीता मोरे होत्या.फेअरडील कंपनीने लवादासमोर दाखल केलेला दावा उलटा गेला असून १२२ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश लवादाने महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. त्याचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.
भूपाल शेटे, प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख,अशोक जाधव, तौफीक मुल्लाणी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. लवादाचा निकाल म्हणजे ठेकेदार, अधिकारी, वकिल यांनी मिलीभगत करुन भ्रष्टाचार केल्याचा पुरावाच असल्याचा आरोप यावेळी या सदस्यांनी केला.