इचलकरंजी : बेकायदेशीर गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर केलेल्या कारवाईतील गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी अभिनंदन महावीर रणदिवे (रा. कोल्हापूर) याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होते. येथील जुना चंदूर रोडवर राजू पाच्छापुरे याचा बेकायदेशीर गुटखा उत्पादनाचा कारखाना होता. या कारखान्यावर पोलिसांनी अन्न औषध प्रशासन विभागाच्या मदतीने दोनवेळा कारवाई करीत मशिनरी, गुटखा व कच्च्या मालासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. २० आॅगस्टला दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईमध्ये पाच्छापुरे याच्याविरोधात कलम ३२८ (विषबाधा करणारे उत्पादन करणे व माहीत असतानाही लोकांना खाण्यासाठी विकणे) लावण्यात आले होते. हे कलम रद्द करतो आणि तुझा कारखानाही बंद करीत नाही, असे सांगून अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे याने पाच्छापुरे याच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी पाच्छापुरे याने कर्नाटकातील जाहिरात कंपनीशी बोलून निर्णय घेतो, असे सांगितले. त्यानंतर तीन लाख रुपयांवर रणदिवे आणि पाच्छापुरे यांच्यात तडजोड झाली. ही रक्कम देण्यासाठी रणदिवे याने पाच्छापुरे याला शुक्रवारी सायंकाळी इचलकरंजीतील राजवाडा चौकात बोलावले होते. पाच्छापुरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रणदिवे याच्याविरोधात तक्रार दिली. शुक्रवारी सायंकाळी राजवाडा चौकात सापळा रचण्यात होता. त्यात लाच घेताना रणदिवे याला पथकाने रंगेहात अटक केली.(वार्ताहर)
‘अन्न औषध’चा अधिकारी तीन लाखांची लाच घेताना अटक
By admin | Published: November 07, 2015 12:35 AM