आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटीबाबत मंगळवारी बोलाविलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने चिडलेल्या थेट पाईपलाईन योजना सर्वपक्षीय कृति समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यालाच कोंडून ठेवत पुईखडी येथील युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयालाच कुलूप ठोकले. यावेळी कार्यकर्त्यांनी खुर्च्या इतस्तत: फेकून अधिकाऱ्यांचा निषेध केला. यापूर्वी मे महिन्यात युनिटी कन्सल्टंटच्या अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला होता.
पुईखडी येथील युनिटी कन्सल्टंटच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी बचाव जनसमूह आणि सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते थेट पाईपलाईनसंदर्भातील त्रुटींबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यकर्र्त्यानी या योजनेच्या अंदाजपत्रकात काही बाबींचे खर्चाचे आकडे कसे फुगविण्यात आले आहेत, याची माहिती मे महिन्यात झालेल्या चर्चेवेळी देत त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारणा केली, परंतु अधिकाऱ्यांना त्यावेळीही समाधानकारक उत्तर देता आले नव्हते.
ही योजना पारदर्शक व वेळेत पूर्ण होणे कशी आवश्यक आहे, त्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे, निविदा काढणे, पत्रव्यवहार करणे, योजनेच्या कामावर दैनंदिन देखरेख ठेवणे, मोजमापे घेऊन नोंदी ठेवणे, कामाची रिडिझाईन करणे, तपासणी करणे आवश्यक असताना त्याबाबत योग्य तो खुलासा अधिकाऱ्यांनी केला नव्हता.
मंगळवारीही या अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती माहिती न दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे उत्तर देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून घेऊन एक बैठक घेतली जाईल. त्यामध्ये सर्व खुलासा करण्यात येईल,असे या प्रकल्पाचे प्रमुख रवींद्र कुलकर्णी यांनी यापूर्वी शिष्टमंडळाला आश्वासन दिल होते, मात्र मंगळवारच्या बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या इतस्त: फेकल्या आणि निषेध केला. या आंदोलनात कृति समितीतर्फे आर. के. पोवार, सतिश कांबळे, अमित सासने, घाडगे, नामदेव, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, महादेव पाटील, अमित चव्हाण, आदींनी भाग घेतला.
इतरांनी काढला पळ, एका अधिकाऱ्याला कोंडले
अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यात येणार असे लक्षात येताच इतर अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला, मात्र राजेंद्र हसले हे या कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले. त्यांना कोंडून घालून कार्यालयालाच कुलूप लावण्यात आले.