कोल्हापूर : आरक्षण सोडत काढताना झालेल्या कथित चुकीचा पश्चाताप सोमवारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. पत्रकार परिषदेत आयुक्त पी. शिवशंकर माहिती देत असताना पत्रकारांनी जेव्हा या अधिकाऱ्यांना धारेवर धरले तेव्हा त्यांची भंबेरी उडाली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. अधिकारी प्रचंड तणावाखाली असल्याचे दिसून आले. महानगरपालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत असून त्याचे संपूर्ण कामकाज ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कामकाजात लेखापरीक्षक संजय सरनाईक, ‘केएमटी’चे प्रभारी अरिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले हे मदत करत आहेत. आरक्षण सोडतीवेळी भोसले व सरनाईक यांनीच पुढाकार घेतला होता. सोडत झाल्यानंतर शनिवारपासून उपायुक्त वाघमळे व सहायक आयुक्त रणदिवे यांचे मोबाईल फोन बंद आहेत. सोमवारीही ते बंदच होते. त्यावरूनच त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव येत असल्याचे जाणवत होते. सोमवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत मोजक्या शब्दांत माहिती देऊन पुढील प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला परंतु पत्रकारांनी ही गंभीर चूक असून त्याला नेमके जबाबदार कोण, अशी विचारणा करताच उपायुक्त वाघमळे व सहायक आयुक्त रणदिवे यांचे डोळे ओले झाले तशाही अवस्थेत या दोघांनी ही चूक आपली असल्याची कबुली दिली. महानगरपालिका यंत्रणेने अत्यंत पारदर्शकपणे सोडत काढण्याचा देखावा केला, पण ती पद्धत चुकीची होती, असा संशयही कोणाला आला नाही. अधिकाऱ्यांचा अतिउत्साहीपणा नडला असावा, असा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. अशा प्रकारच्या चुका अन्य कोणत्या महापालिकेत घडल्याचेही ज्ञातनाही. त्यामुळे झाल्या प्रकाराबद्दल संशय आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचे डोळे झाले ओले
By admin | Published: August 04, 2015 12:56 AM