कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर आलेल्या हरकती, त्यांचे निराकरण आणि प्रत्यक्ष मतदार यादीतील दुरुस्ती याचा ताळमेळ लागत नसल्याने सोमवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्वच अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. सर्वच कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून मतदार यादीतील दुरुस्त्यांची माहिती घेतली.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. ३ मार्चला महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करायच्या होत्या; परंतु याद्या करण्यात ‘बीएलओ’ पातळीवर अनेक चुका झाल्यामुळे यादीतील घोळ अजूनही मिटलेला नाही. काही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणे कामे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुका राहिल्या. ८१ प्रभागांतील मतदार यांद्यावर १८०० हरकती आल्या. एका चुकीवर तीन, चार हरकती आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचारीही चक्रावले आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी प्रारूप याद्या, त्यातील चुका, प्राप्त हरकती, त्यांचे निराकरण यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगास सादर केला. त्यानंतरही याद्या दुरुस्तीचे काम तसेच तयार याद्यांचे छाननीचे काम सुरू आहे. मतदार यादीत अजूनही काही त्रुटी असल्याचे लक्षात येताच बलकवडे चांगल्याच संतापल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना झापले.
कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतरही त्यांनी मतदार याद्यांचे काम केलेल्या सर्व कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांना निवडणूक कार्यालयात येण्यास बजावले. सायंकाळी उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देऊनही त्रुटी राहिल्यामुळे प्रशासकांनी एकेकांना चांगलेच फैलावर घेतले.
-काहींची चूक सर्वांना नडली -
महापालिकेच्या एक-दोन विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी पहिल्यापासूनच मतदार याद्यांचे काम गांभीर्याने घेतले नव्हते. प्रारूप याद्या तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊनही त्यांनी खात्री करून घेतली नव्हती. त्यामुळे पंचवीस ते तीस प्रभागांत मोठ्या प्रमाणात चुका राहून गेल्या. सर्वाधिक चुका या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडून झाल्या आहेत. काही अधिकाऱ्यांची चूक मात्र महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांना भोगावी लागत आहे.