लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच्या राजकीय चर्चेपेक्षा मला देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चा अधिक महत्त्वाची असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी कृतीतून दाखवून दिले. नवी दिल्लीत शेतकरी नेत्यांसमवेत मी बैठकीत व्यस्त असल्यामुळे मुंबईतील चर्चेला उपस्थित राहता येणार नाही, असे शेट्टी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सांगून टाकले. या बैठकीसाठी मी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून कुणालाही नियुक्त केलेले नाही आणि करायचेच असेल तर प्रदेशाध्यक्षांना तशा सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहा हे शुक्रवारपासून तीनदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपच्या मित्रपक्षांशी चर्चा करण्याचे शहा यांनी ठरविले होते. त्यानुसार दानवे यांनी निरोप दिले. अन्य मित्रपक्ष लगबगीने जाऊन शहा यांना भेटून गेले; परंतु शेट्टी यांनी मात्र अप्रत्यक्षपणे त्याकडे पाठ फिरविली. दानवे यांनी शेट्टी यांना तुम्ही दिल्लीतील बैठकीस हजेरी लावून तातडीने विमानाने मुंबईला या, असाही प्रस्ताव दिला होता; परंतु शेट्टी यांनी तसे आपल्याला करता येणार नसल्याचे सांगितले.राज्यात भाजप घटकपक्षांच्या मदतीने सत्तेत आहे. या घटकपक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हा मुख्य पक्ष आहे. त्यामुळे अमित शहा यांच्यासोबत चर्चेसाठी शेट्टी यांनी यावे, असा भाजपचा प्रयत्न होता. महत्त्वाचा घटकपक्ष असूनही गेल्या काही दिवसांत शेट्टी हे सातत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. ती भाजपच्या जिव्हारी लागत आहे. त्या अनुषंगानेही काही चर्चा या बैठकीत अपेक्षित होती.
जिल्ह्यात आॅफलाईन खत विक्री
By admin | Published: June 16, 2017 11:35 PM