भारत चव्हाण कोल्हापूर : कधी-कधी आक्रमकपणा लोकांना आवडत नाही. राजेश क्षीरसागर यांनी जनतेच्या हिताकरिता आक्रमकपणा स्वीकारला; परंतु मूठभर लोकांनी त्याचे भांडवल करीत त्यांच्यावर आरोप केले. क्षीरसागर यांची प्रतिमा अशा आरोपांतून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात विरोधक यशस्वी झाले. दुसऱ्या बाजूने शिवसेनेतील गद्दारीही त्यांना नडली. पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले.
शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता. कोणी निवडणूक लढवावी, याचे विचारमंथन कॉँग्रेसमध्ये सुरू होते. कोणीच पुढे येईनात. मधुरिमाराजे छत्रपती यांचीही कॉँग्रेस नेत्यांनी मनधरणी केली; परंतु त्यांनीही नकार दिला. त्यामुळे क्षीरसागर हॅट्ट्रिक करतील, याची शक्यता जास्त वाटत होती. कॉँग्रेसकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांच्यापैकी एकही निवडून येण्याची शक्यता नव्हती; म्हणून भाजपमध्ये असलेल्या चंद्रकांत जाधव यांना पक्षात घेऊन कॉँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असल्याने आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मोठे पाठबळ दिले.
- दहा वर्षे आमदार म्हणून केलेले काम, विविध आंदोलनांतील आक्रमक सहभाग घेतलेल्या क्षीरसागर यांच्यासमोर जाधव यांचा टिकाव लागेल का, याची धास्ती कॉँग्रेसच्या गोटात होतीच; पण एकदा तिकीट मिळाले म्हटल्यावर उमेदवारी मागणाऱ्यांसह सर्वच नेते, कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रचारात भाग घेतला. जिरवाजिरवीच्या भानगडीत कोणी पडले नाही. एकीकडे कॉँग्रेसमध्ये सकारात्मक विचार आणि जिंकण्याची तयारी सुरू असताना शिवसेनेत मात्र भलतेच घडत होते.
- या निवडणुकीत आमदार क्षीरसागर एकीकडे आणि बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक भलतीकडेच जात होते. मागच्या दोन निवडणुकांत हाच अनुभव क्षीरसागर यांनी घेतला होता. त्यामुळे यावेळी तरी हा दुरावा संपविण्याचा कोणी प्रयत्न करील असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. क्षीरसागर यांनीही सर्व पदाधिकाºयांना दुर्लक्षित केले. त्यामुळे ते विरोधकांच्या छावणीत पोहोचले होते. एवढेच नाही तर त्यांनी उघडपणे कॉँग्रेसचा प्रचार करण्यास सुरुवात केली. अखेर ही गद्दारीच त्यांना नडली.
- विरोधक खंडणीबहाद्दर, जुलमी राजकारण, भ्रष्टाचाराचे आरोप करीत असताना त्याचे खंडन करण्यात क्षीरसागर कमी पडले. उलट सर्वसामान्य जनतेवर कोणी अन्याय करीत असेल तर मी सुशिक्षित गुंड व्हायला तयार आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या आक्रमकपणाचे समर्थन केले. हा आक्रमकपणा त्यांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरला. शिवाजी पेठेतील इंगवले बंधूंमधील वादाचाही त्यांना फटका बसला. जाधव यांनी शेवटच्या क्षणी कॉँग्रेसच्या मैदानावर येऊन विजयी गोल केला.