कोल्हापूर : पोटातील बाळाचे लिंग मुलीचे आहे असे सांगून अवैधरीत्या महिलांचा गर्भपात केला जातो, अशा प्रकारच्या गर्भपातामध्ये महिलेच्या जीवितास धोका असतो. बऱ्याच वेळेस बेकायदेशीर गर्भपात झाल्यानंतर हा गर्भ मुलाचा असल्याचे लक्षात येते. परंतु, सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर असल्यामुळे ते उघडकीस येत नसल्याचे चित्र पुढे आले आहे. आरोग्य विभागामार्फत केल्या गेलेल्या कारवाई दरम्यान अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत.
मुलींची घटती संख्या लक्षात घेऊन १९९४ साली प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा (पीसीपीएनडीटी)झाला. आजपर्यंत राज्यात बऱ्याच डॉक्टरांवर खटले दाखल आहेत. या गुन्ह्यांत फक्त डॉक्टरच गुन्हेगार असतात असे नसून डॉक्टरांकडे जाणारे लोकही तितकेच जबाबदार आहेत.
- वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसताना बोगस डॉक्टरांकडून गर्भलिंग निदान केले जाते. अशा डॉक्टरांना पोटातील गर्भाचे लिंग कळतच नाही, असे असताना देखील मुलगीच आहे असे दाबून सांगून आर्थिक लुबाडणूक होते.
- जुने विनावापर किंवा काम न करणारे सोनोग्राफी मशीन अवैधरीत्या बाळगून त्याच्यावर सोनोग्राफी केल्याचे फक्त भासवले जाते. मुलगीच असल्याचे सांगून बेकायदेशीर गर्भपातास भरीस पाडले जाते.
- कारवाई दरम्यान डमी केस म्हणून पाठविलेल्या महिलेस डॉक्टरांनी मुलगी असल्याचे सांगून २२ हजार रुपये घेऊन गर्भपातासाठी बोलविले. डॉक्टरांवर कारवाई केली. दरम्यान डमी केस म्हणून गेलेल्या महिलेस प्रसुतीनंतर मुलगा झाला. फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने गर्भ मुलीचाच आहे असे सांगितल्याचे स्पष्ट झाले.
- गर्भलिंग निदानावर बंदी घातल्यानंतर १ हजार रुपयामध्ये होणारे काम आता ३५ ते ५० हजार रुपये घेऊन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बऱ्याचदा गरोदर महिला मुलाच्या हट्टापायी स्वतःचा जीव धोक्यात घालून अज्ञात स्थळी गर्भलिंग निदानासाठी जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
लाखाचे बक्षीस..
आपल्या आजूबाजूस बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्यास या बाबतची माहिती टोल फ्री नंबर 18002334475 या क्रमांकावर देण्यात यावी. अचूक माहिती देणाऱ्या तसेच हे सिद्ध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तीस एक लाखाचे बक्षीस राज्य शासनातर्फे देण्यात येते. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तथ्य आढळल्यास संशयित डॉक्टरवर खटला दाखल झाल्यानंतरच हे बक्षीस दिले जाते.