संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले आसाम येथील रेल्वेस्थानकावरील महात्मा गांधी यांचे तैलरंगातील भव्य पोर्ट्रेट आजही त्यांच्या कुटुंबाने आर्ट गॅलरीत जपून ठेवले आहे. गांधींजींच्या आयुष्यातील अनेक जीवनप्रसंग पेंटिंगच्या माध्यमातून रेखाटून जगभर त्याचे चित्रप्रदर्शन भरविण्याची कलायोगी यांची इच्छा होती.चित्रपटाच्या कलात्मक पोस्टरसाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरचे कलायोगी जी. कांबळे हे गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित चित्रे रेखाटून त्यांचे प्रदर्शन भरविणार होते. कम्युनिस्ट नेते लेनिन यांच्या जीवनावरील मुंबईत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनादरम्यान कलायोगींना ही कल्पना सुचली होती. दिवंगत चित्रकार रियाज शेख आणि कलायोगींचे चिरंजीव अशोक कांबळे याचे साक्षीदार होते.गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे कलायोगींनी महात्मा गांधी यांचे नातू कनू गांधी यांच्याकडून राजकोट येथून मिळविली होती. या छायाचित्रांवरून त्यांनी सुमारे ५० ते ६० कच्ची पेन्सिल स्केचेस काढली. मात्र, या प्रदर्शनासाठीचा अवाढव्य खर्च करणे शक्य न झाल्याने ही कल्पना मागे पडली. तरीही कलायोगींनी कस्तुरबा गांधी आणि गुुवाहटी येथील रेल्वेस्थानकावरील गांधीजींचे तैलचित्र मात्र रेखाटले. हा ठेवा आजही कलायोगींच्या नावे उभारलेल्या आर्ट गॅलरीत उपलब्ध आहे.
ज्यूटवर चितारले तैलचित्रगुवाहटी येथील रेल्वेस्थानकावर स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारा निधी महात्मा गांधी जनतेकडे मागतानाचा प्रसंग रेखाटण्यासाठी जी. कांबळे यांना तीन महिने लागले. विन्सर ॲन्ड न्यूटन कंपनीच्या आर्टिस्ट क्वालिटीच्या रंगामध्ये सात बाय आठ आकाराचे १९६८ मधील हे दर्जेदार तैलचित्र ज्यूटच्या कॅनव्हासवर रेखाटलेले आहे. मंगळवार पेठेतील कांबळे यांच्या घरीच ते बराच काळ होते. २०१४ मध्ये त्यांच्याच नावे उभारलेल्या आर्ट गॅलरीत त्यांच्या कुटुंबीयांनी सध्या ते जपून ठेवलेले आहे.