कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ सुरू असून, किरकोळ बाजारात ११० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींना तेलाची फोडणी जरा जपूनच टाकावी लागणार आहे. भाजीपाल्याची आवक, दरदाम स्थिर असून कडधान्यांच्या दरांतही फारसा चढउतार दिसत नाही.केंद्र सरकारने तेल आयातकरात वाढ केल्याने गेले महिनाभर तेलाच्या दरात वाढ होत गेली. त्याचबरोबर चीनकडून सूर्यफुलाच्या तेलाची जास्त खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोड्या तेलाला तेजी आहे. सूर्यफुलाच्या दरात वाढ झाल्याने आपोआपच सरकी तेलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात सरकी तेलाचा दर ११० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट काहीसे कोलमडणार आहे.कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. गेल्या आठवड्यापेक्षा त्यात फारसा चढउतार दिसत नाही. तूरडाळ १०० रुपये, हरभराडाळ ७०, मूग १००, मूगडाळ १२०, मटकी १२० रुपये किलो आहे. शाबू ६५, तर साखर ३८ रुपये किलो आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली आहे. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने गेल्या आठवड्यापेक्षा आवक वाढली आहे. त्यामुळे दरात चढउतार दिसत नाही.
टोमॅटोच्या दरांत थोडी वाढ झाली असून किरकोळ बाजारात दर ५० रुपये किलोपर्यंत आहे. दोडका, गवारी, वाल ६० रुपये किलो आहे. वांगी, ढबू, कारली, ओली मिरची ४० रुपये किलोपर्यंत आहे. कोबी, फ्लॉवर, भेंडीचे दर स्थिर आहेत. कांदापात १० व मेथी २० रुपये पेंढी आहे. एकूणच भाजीपाला मार्केटमध्ये गत आठवड्याच्या तुलनेत फारसा फरक दिसत नाही.फळबाजारामध्ये सफरचंद, डाळींब, चिक्कू, सीताफळ, मोसंबी या फळांची रेलचेल पाहावयास मिळते. सफरचंद, चिक्कूंना अधिक मागणी असून किरकोळ बाजारात सफरचंद ८०, तर चिक्कू ५० रुपये किलो आहेत. त्याशिवाय केव्ही, पपई या फळांनाही मागणी आहे.दसऱ्याच्या तोंडावर तेल कडाडलेदसरा-दिवाळीत गोड्या तेलाची मागणी अधिक असते. दसऱ्याच्या तोंडावरच तेलाने शंभरी पार केल्याने ऐन सणासुदीत दर कोठेपर्यंत जातील, याचा अंदाज बांधता येत नाही.
असे आहेत तेलाचे किरकोळ बाजारातील दर, प्रतिकिलो -
- सरकी - ११० रुपये
- पामतेल - ११५ रुपये
- सूर्यफूल - १३० रुपये
- शेंगतेल - १६० रुपये
चीनने सूर्यफुलाच्या तेलाची खरेदी वाढविल्याचा परिणाम सध्या देशांतर्गत बाजारपेठेत दिसत आहे. खरीप काढणीनंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.- केतन तवटे, तेलाचे व्यापारी, कोल्हापूर